अणदूर, पुढारी वृत्तसेवा
हैदराबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र ६५ वर सातारा-हैदराबाद (MH 13 U 7951) ही बस पलटी झाली. आज (मंगळवार) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. यात जवळपास ३० ते ४० प्रवासी प्रवास करत होते. यातील बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना अणदूर येथील प्राथमिक रुग्णालयात व नळदुर्ग येथील जिल्हा उप रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. तलावावरती असलेल्या पुलाला कठडे नसल्याने हा अपघात झाला आहे. यापूर्वी याच ठिकाणी माल वाहतूक करणारा ट्रक तलावात गेला होता. सुदैवाने कोणतीच जीवितहानी झाली नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर प्रवासी जखमी झाले आहेत.
हैदराबाद-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ गतीने चालू आहे. त्यातच या मार्गावर अपघातांचे प्रमाण अधिक आहे. मागील १-१२ वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू आहे. मात्र या राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? हा मोठा प्रश्न आहे. या कामाच्या दर्जावरती अनेक प्रश्न उठवले जात आहेत. अनेक ठिकाणी जुने पुल वापरूनच या राष्ट्रीय महामार्गाचे काम केले जात असल्याचा आरोप होत आहे.