

भीमाशंकर वाघमारे
धाराशिव : विधान परिषदेत भाजपकडून बसवराज पाटील विजयी झाल्याच्या निमित्ताने जिल्ह्याला त्यांच्या रूपाने सातवा आमदार मिळाला आहे. विधान परिषदेत जिल्ह्याचे वर्चस्व असून तब्बल तीन आमदार कार्यरत असतील. सध्या मराठवाडा पदवीधर आ. सतीश चव्हाण, मराठवाडा शिक्षक आ. विक्रम काळे कार्यरत आहेत. आता त्यात बसवराज पाटील यांची भर पडणार आहे.
धाराशिव जिल्ह्यात उमरगा, तुळजापूर, धाराशिव आणि परंडा असे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी तुळजापूर व परंड्यात महायुतीचे आमदार विजयी झाले आहेत. यात आ. राणाजगजितसिंह पाटील आणि प्रा. तानाजी सावंत यांचा समावेश आहे. तर उमरगा आणि धाराशिव येथे आ. प्रवीण स्वामी तसेच आ. कैलास पाटील प्रतिनिधित्व करतात. हे दोघेही ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रतिनिधित्व करतात.
या शिवाय विधान परिषदेतही जिल्ह्यातील नेत्यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस एक असतानासुद्धा सतीश चव्हाण तसेच विक्रम काळे यांनी आपली पकड मजबूत ठेवली आहे. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर या दोघांनी अजित पवारांच्या पक्षाला पसंती दिली आहे. आ. चव्हाण हे २००८ पासून पदवीधर मतदारसंघाचे आमदार असून यंदा त्यांची मुदत संपत आहे. तर आ. काळे हे २००६ पासून शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांची मुदत २०२९ मध्ये संपणार आहे.
आ. चव्हाण हे लोहारा तालुक्यातील मूळ रहिवासी असून आ. काळे हे धाराशिव तालुक्यातील पळसपचे सुपुत्र आहेत. आता भाजपतर्फे स्थानिक स्वराज्य संस्था गटातून विजयी झालेले बसवराज पाटील हे मुरुम (ता. उमरगा) येथील रहिवासी आहेत. हे तिघेही जिल्ह्याचे मूळ रहिवासी असले तरी त्यांचा सध्याचा रहिवास परजिल्ह्यात आहे. यामध्ये आ. चव्हाण छत्रपती संभाजीनगर, आ. काळे लातूर (प्रामुख्याने) तर बसवराज पाटील आता लातूरचे भाजप जिल्हाध्यक्ष आहेत. असे असले तरी त्यांचे कार्यक्षेत्र या जिल्ह्यातही येत असल्याने आ. काळे, आ. चव्हाण यांचा फायदा जिल्ह्याला होत असतोच. आता आ. पाटील हेही निधीच्या बाबतीत जिल्ह्याकडे लक्ष देतील, अशी नागरिकांची धारणा आहे.
महायुतीची पॉवरफुल ताकद
विधानसभेचे दोन आमदार तसेच विधानपरिषदेतील तिन्ही आमदार महायुतीचे असल्याने या पक्षांचे कार्यकर्ते खूश आहेत. आ. चव्हाण व आ. काळे हे राष्ट्रवादीचे आहेत, तर आ. पाटील भाजपचे आहेत. शिंदे शिवसेनेचे केवळ आ. तानाजी सावंत आहेत. आ. राणाजगजितसिंह पाटील हे तुळजापूरमधून विजयी झाले आहेत. परिणामी जिल्ह्यात या आमदारांमुळे महायुती अधिक मजबूत झाली आहे. अशातच खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर हेही ठाकरेंचा हात सोडून शिंदेंच्या गोटात सामील झाल्याने राजकीय समीकरणे बदलत चालली आहेत