

Balasaheb Thorat on BJP Election Tactics
धाराशिव : पैशांचा बेसुमार वापर, बिनविरोध निवडणुकांसाठी दहशतीचे वातावरण, स्वायत्त संस्थांचा गैरवापर आणि द्वेषमूलक राजकारणाच्या जोरावर भाजप लोकशाहीची गळचेपी करत असून ही निवडणूक लढविण्याची पद्धत देशाच्या भविष्यासाठी गंभीर धोका निर्माण करणारी आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
धाराशिव दौऱ्यावर आल्यानंतर बुधवारी (दि. २१) ते पत्रकारांशी बोलत होते. थोरात म्हणाले की, नुकत्याच पार पडलेल्या महापालिका व नगरपालिका निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजपने बिनविरोध निवडणुकांसाठी कोणकोणत्या पद्धती वापरल्या, हे सर्वांनी पाहिले आहे. ही प्रथा चुकीची असून लोकशाहीला चुकीच्या दिशेने नेणारी आहे. निवडणुका जिंकण्यासाठी स्वायत्त संस्थांचा होत असलेला गैरवापर अत्यंत चिंताजनक आहे.
धर्मा-धर्मांतील वाढते वाद देशाच्या एकात्मतेसाठी घातक असून देशाच्या भविष्यासाठी भाजपने अधिक विचारपूर्वक राजकारण करावे, असा सल्लाही थोरात यांनी दिला. अशा प्रतिकूल परिस्थितीतही काँग्रेसला जे काही यश मिळाले आहे, ते निकोप असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यघटनेची प्रस्ताविका हीच काँग्रेसची विचारधारा असल्याचे ठामपणे सांगत, जिल्हा परिषद निवडणुका झाल्यानंतर पक्ष संघटन मजबूत करण्यावर अधिक जोर देण्यात येणार असल्याचे थोरात यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यातील पक्षाच्या कामाचा आढावा घेतला जाईल आणि जिथे आवश्यक असेल तिथे बदल करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उमेश राजेनिंबाळकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, प्रशांत पाटील, धनंजय राऊत, खलील सय्यद यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.