

A separate fire safety policy will be formulated for rural areas
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : येडशी येथील भीषण आग दुर्घटनेत करंडे कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्यानंतर ग्रामीण महाराष्ट्रासाठी स्वतंत्र आणि सक्षम अग्निशमन यंत्रणा उभारण्याच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच मृतांच्या वारसांना विशेष आर्थिक सहाय्य देण्याच्या मागणीवरही 'मदत करा' अशा सूचना संबंधित यंत्रणेला दिल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
धाराशिव तालुक्यातील येडशी येथे ९ नोव्हेंबर रोजी पहाटे करंडे कुटुंबाच्या घरवजा दुकानाला भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत दोन बालके आणि दोन ज्येष्ठ नागरिकांसह सहा जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी सुरुवातीला धाराशिवहून एकच अग्निशमन वाहन उपलब्ध झाले. त्यानंतर तुळजापूर आणि कळंब येथून अतिरिक्त वाहने मागवावी लागली.
मात्र, मदत पोहोचेपर्यंत महत्त्वाचा वेळ निघून गेला होता. या घटनेने ग्रामीण भागातील अग्निशमन व्यवस्थेतील त्रुटी समोर आल्या आहेत. ग्रामीण व दुर्गम भागात अग्निशमन केंद्रे नसल्याने आग लागल्यानंतर दूरवरून वाहने बोलवावी लागतात. त्यामुळे मदत पोहोचण्यास विलंब होतो. ही परिस्थिती बदलण्यासाठी राज्यभरातील ग्रामीण अग्निशमन सुविधांचे सर्वेक्षण करून स्वतंत्र धोरण तयार करावे, अशी मागणी आ. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
तालुका स्तरावर सुसज्ज अग्निशमन केंद्रे, आधुनिक वाहने, प्रशिक्षित कर्मचारी, तातडीच्या प्रतिसादाची यंत्रणा आणि स्वतंत्र निधीची तरतूद करण्याची मागणीही करण्यात आली आहे. प्रलंबित अग्निशमन वाहनांच्या प्रस्तावांवर कालमर्यादेत निर्णय घेण्याची विनंतीही त्यांनी केली.
करंडे कुटुंबाच्या वारसांना मदत
करंडे कुटुंबातील सहा सदस्य गमावलेल्या वारसांना विशेष बाब म्हणून भरीव आर्थिक सहाय्य द्यावे आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी मदत करावी, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक शेरा देत संबंधित यंत्रणेला मदतीच्या सूचना दिल्या आहेत.