धाराशिव : वरवडा ते औसा गुडघ्यावर चालून वरवड्याचा युवका मराठा आरक्षणाला पाठिंबा | पुढारी

धाराशिव : वरवडा ते औसा गुडघ्यावर चालून वरवड्याचा युवका मराठा आरक्षणाला पाठिंबा

औसा; पुढारी वृत्तसेवा : धाराशिवमधील औसा तालुक्यात मराठा आरक्षणासाठी विविध प्रकारे मराठा समाज पाठिंबा देत आहे. या आरक्षणाच्या आंदोलनात औसा तालुक्यातील मराठा बांधव अग्रगण्य आहेत. येत्या रविवारी (दि.10) औसा येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची सभा आहे. मराठा आंदोलनासाठी तालुक्यातील एक मराठा युवक वरवडा ते सभा स्थळ औसापर्यंतचे अंतर गुडघ्यावर चालून मराठा आरक्षणाला अनोखा पाठिंबा देणार आहे.

वरवडा ते औसा येथील तरुण रामानंद दयानंद लुंगसे हा मराठा आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील यांना औसा येथील उटगे मैदान या ठिकाणी असलेल्या नियोजित सभेच्या जागी वरवडा येथून ते सभेच्या औसा येथील ठिकाणापर्यंत गुडघ्यावरती चालत जाऊन अनोखा पाठिंबा देण्यासाठी सदरील युवकाने सुरुवात केली असून सध्या तो औसा शहरापासून अवघ्या 8 किमी अंतरावर आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असून मराठा समाजातील तरुण आरक्षण मिळालेच पाहिजे याकरिता सर्व मराठा तरुण प्रत्येक आंदोलनात सहभागी होत आहेत. तालुक्यातील अनेक गावांत साखळी उपोषण झाले .त्यातच औसा मराठा आंदोलनासाठी औसा तालुक्यातील दोघांनी आपले जीवन संपवले आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरून मराठा समाजाला न्याय देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या फिरत असलेले मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची रविवारी औसा येथे सभा आहे. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी औसा तालुक्यातील वरवडा येथील तरुणाने एक अनोखा निर्णय घेतला असून सदरील तरुण आपले गाव वरवडा ते औसा हे अंतर गुडघ्यावरती चालत पूर्ण करणार आहे. या युवकांच्या धाडसी निर्णयामुळे तो ज्या गावातून जात आहे तेथे त्यांचे सहर्ष स्वागत मराठा बांधवाकडून होत असून त्याच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक पण होत आहे.

हा आरक्षणाचा मुद्दा दैनंदिन जीवनामध्ये अत्यंत निकडीचा आणि गरजेचा होत चालला आहे हेच या अनोख्या आंदोलनामधून सिद्ध होते.मराठा तरुणाचे खुल्या प्रवर्गातून होत असलेले हाल पाहून सर्व मराठा तरुण सध्या पेटून उठले असून जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा समाज शांत होणार नाही अशी भावना सध्या तालुक्यातील मराठा बांधव व्यक्त करीत आहेत.

Back to top button