Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी’च्या माध्यमातून फुटले भाजपअंतर्गत वादाला तोंड: सुधीर पाटलांचा आमदार पाटील यांच्यावर निशाणा

राणाजगजितसिंह पाटील, सुधीर पाटील
राणाजगजितसिंह पाटील, सुधीर पाटील


धाराशिव : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. विजेत्या मल्‍लांनी बक्षिसांची लयलूटही केली. यानिमित्ताने धाराशिवचे नाव क्रीडा वर्तुळात केंद्रस्थानी राहिले खरे; मात्र स्पर्धेच्या आयोजन व अडथळ्यांवरुन आयोजक सुधीर पाटील यांनी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर निशाणा साधल्याने भाजपअंतर्गत वादाला यानिमित्ताने तोंड फुटल्याचे मानले जात आहे. Maharashtra Kesari

सुधीर पाटील हे धाराशिव जिल्ह्यातील शिक्षणसम्राट म्हणून ओळखले जातात. पूर्वी ते शिवसेनेत होते. पाच वर्षांपूर्वी त्यांनी शिवसेनेचा त्याग करत भाजपचे कमळ हाती घेतले. तर त्यानंतर काही दिवसांतच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असलेले आ. राणाजगजितसिंह पाटील हेही भाजपमध्ये दाखल झाले. २०१४ मध्ये सुधीर पाटील यांनी तुळजापूर विधानसभा निवडणूक शिवसेनेकडून लढविली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. तर २०१९ मध्ये राणाजगजितसिंह पाटील भाजपच्या उमेदवारीवर विजयी झाले होते. या निवडणुकीत सुधीर पाटील यांनी आ. पाटील यांचा प्रचार केला होता. असे असतानाही या दोन नेत्यांत कटूता निर्माण झाल्याचे कुस्ती स्पर्धेच्यामाध्यमातून उघडकीस आले आहे. Maharashtra Kesari

अंतर्गत वादाची किनार त्याला असली तरी आगामी विधानसभा निवडणुकीचे संदर्भही त्याला असावेत, अशी चर्चा रंगली आहे. दोन्ही नेते एकाच पक्षात असताना जाहीर स्टेजवर सुधीर पाटील यांनी आ.पाटील यांचा नामोल्‍लेख न करता 'तुळजापूरच्या लोकप्रतिनिधींनी स्पर्धेच्या आयोजनात अडथळे आणले. मी खंबीर असल्याने स्पर्धा यशस्वी झाली.यापुढे राजकारणात बघू', असे वक्‍तव्य केल्याने भाजपमध्ये सारे काही आलबेल नसल्याचेच दिसू लागले आहे. सुधीर पाटील यांच्या या टीकेला अर्थातच आ.पाटील यांच्याकडून काही प्रत्युत्तर देण्यात आलेले नाही; मात्र भविष्यात याचे काय पडसाद उमटतात याकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Kesari : स्पर्धा यशस्वी : पाटील

'दै. पुढारी'शी बोलताना सुधीर पाटील म्हणाले, की कितीही अडथळे आले असले तरी राज्यातील मल्‍लांनी ही स्पर्धा यशस्वी केली आहे. ९८० मल्‍ल कुस्ती स्पर्धेत सहभागी झाले होते. तर मोठ्या गटात ८३ मल्‍लांनी शड्डू ठोकला. याचा अर्थ राज्यातील सर्वच जिल्ह्यांचे प्रतिनिधीत्व झाले. या स्पर्धेत स्कॉर्पिओ (एन), एक ट्रॅक्टर तर २० बुलेट अशा बक्षिसांची लयलूट झाली. याचे सर्व श्रेय असोसिएशन तसेच सर्व स्वंयसेवक, आयोजक व कुस्ती प्रेमींना जाते.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news