

उमरगा; पुढारी वृत्तसेवा : शहरातील मध्यवस्तीतील शास्त्रीनगर येथे भरदिवसा घरफोडी करून सात लाख रुपयांची चोरी झाल्याची घटना शनिवारी (दि.४) घडली. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत दागिन्यांसह पन्नास हजारांची रक्कम देखील चोरांनी लंपास केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील शास्त्रीनगर येथे राहणारे बाबू शंकर पवार हे एसटीमध्ये चालक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या हाताला मार लागल्याने दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ते दवाखान्यात गेले होते. दरम्यान घरात कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी गेटवरून उड्या टाकून आत प्रवेश केला. बंद घराचे कुलूप तोंडून घरात प्रवेश करून बेडरूममध्ये ठेवलेल्या कपाटाचे कुलूप तोडून तेरा तोळे सोन्याचे दागिने आणि रोख ५० हजार रुपये आसा अंदाजे सात लाखांचा मुद्देमाल चोरांनी चोरून नेला.
पवार यांनी नोकरीवरून निवृत्त झाल्यानंतर मिळालेल्या रकमेचे व सोन्याचे दागिने बनवले असल्याची माहीती पोलिसांना दिली. चोरी झालेल्या घराजवळच शेजाऱ्यांचे बांधकाम चालू आहे आणि मजूर आणि कामगार दिवसभर काम करीत आहेत. भर दिवसा झालेल्या चोरीमुळे जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी घडलेल्या या घटनेची सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उमरगा पोलिसात सुरु होती.