Baby Dead : १४ महिन्याच्या बाळाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू; नातेवाईकांचा आरोप, भूम तालुक्यातील घटनेने खळबळ | पुढारी

Baby Dead : १४ महिन्याच्या बाळाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू; नातेवाईकांचा आरोप, भूम तालुक्यातील घटनेने खळबळ

भूम; पुढारी वृत्तसेवा : भूम तालुक्यातील मौजे शेकापूर येथील सादिया सद्दाम पठाण या १४ महिन्याच्या चिमुरडीचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला.

सादियाला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले असता ऑक्सिजन पुरवठा कमी होत असल्याने भूम येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले होते. दरम्यान तत्काळ ऑक्सिजन न लावल्याने मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. दिरंगाई करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई व्हावी म्हणून समाजातील युवकांनी तब्बल दोन तास मृतदेह दवाखान्यात ठेवला होता.

तहसीलदार सचिन खाडे, पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी हजेरी लावत परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर कार्यवाही व गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले. या घटनेची माहिती कळताच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. इस्माईल मुल्ला यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच दोषींवर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख बालाजी गुंजाळ, संजय पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निलेश शेळवणे, विशाल ढगे, आसिफ जमादार ,शेकापूरचे सरपंच आतील शेख, मोहिज सय्यद रफीक पिरजादे, अरुण गाढवे, विठ्ठल बाराते, अनिल शेंडगे आदी उपस्थित होते.
दोषींवर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करावी अशी मागणी स्वराज्य संघटनेचे विलास पवार, गणेश नलवडे यांनी केली.

Back to top button