

धाराशिव : खरीप 2025 हंगामातील पीकविम्याबाबत मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेला तांत्रिक पेच अखेर सुटला असून धाराशिव जिल्ह्यातील 4 लाख 5 हजार 44 शेतकऱ्यांना सुमारे 336 कोटी 46 लाख रुपयांचा पीकविमा वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने () विमा कंपनीचे आक्षेप फेटाळल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
खरीप 2025 अंतर्गत धाराशिव जिल्ह्यासाठी आयसीआयसीआय लोंबार्ड ही विमा कंपनी कार्यरत आहे. जिल्ह्यातील 55 विमा युनिटमधील 368 पीक कापणी प्रयोगांवर कंपनीने प्रक्रियेत त्रुटी असल्याचा दावा करत आक्षेप नोंदवले होते. मात्र जिल्हाधिकारी स्तरावर हे आक्षेप फेटाळण्यात आले होते. त्यानंतर कंपनीने राज्यस्तरीय समितीकडे अपील केले होते. आ. पाटील यांनी या प्रकरणी कृषी विभागाचे प्रधान सचिव परिमल सिंग यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.
ऑनलाईन सुनावणीत विमा कंपनीचे आक्षेप पुराव्याअभावी फेटाळण्यात आले. परिणामी कृषी आयुक्तालयाने पात्र शेतकऱ्यांचे दावे तातडीने निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक 4 लाख 40 हजार शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा विमा उतरवला होता. त्यापैकी सुमारे 4.05 लाख शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.
दरम्यान, 2025 मधील अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे बाधित 7 लाख 13 हजार 871 शेतकऱ्यांना शासनाने यापूर्वीच 524 कोटी 78 लाख रुपयांची मदत वितरित केल्याची माहितीही आमदार पाटील यांनी दिली.