अणदूर : हैदराबाद सोलापूर राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक ६५) वरील तुळजापूर तालुक्यातील केरुर येथे असलेल्या बाभळगाव तलावाच्या पुलास धडकून सांगोला - हैद्राबाद बसचा अपघात झाला. यात तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
मंगळवारी (दि. २४) दुपारी २:३० च्या सुमारास सांगोला येथून ही बस (एम एच १३ यु ७९५१) हैद्राबादकडे जाताना रिमझिम पाऊस असल्याने व राष्ट्रीय महामार्ग याला मोठे खड्डे पडल्याने व रस्त्याच्या मधील भागतील रस्ता खचल्याने गाडीची हालचाल होऊन हा अपघात घडला. यात जवळपास २१ प्रवाशी या बस मधून प्रवास करीत होते. यातील सर्वच प्रवाशांना छोट्या मोठ्या प्रमाणावर मार लागला असून जखमीना नळदुर्ग येथील जिल्हा उप रुग्णालयात उपचार करण्यात आला २१ पैकी ३ प्रवाशांना मोठा मार लागल्याने त्यातील एकाला सोलापूर जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
तलावावरती या जुन्या असलेल्या पुलाला सुरक्षा कटडे नसल्याने हा अपघात झाला. महामार्ग रुंदीकरणात या जुन्या पुलाचा वापर केल्याने हा पूल अरुंद असल्याने या ठिकाणी सातत्याने अपघात होतात. सुदैवाने या अपघातात कोणतीच जीवितहानी झाली नाही. मात्र सर्व प्रवशांना जखमा झाल्या आहेत.
यात : जिजाबाई संतोष पांढरे (शहापूर), प्रशांत अण्णाराव अंबाळे (लाड चिंचोली), अनिल आप्पासाहेब कदम (दहीटना), लक्ष्मण चव्हाण खडके (बोरमणी जि. सोलापूर), नारायण नागनाथ शेंडगे (उमरगा), नंदा शेषराव काळे (जळकोट), शेखर संतोष स्वामी (उमरगा), खाजावी उजने (मुरुम), संतोष बप्पा साबळे (नीतर्ज), मधुकर शंकर बिद्री (उमरगा), सुजय मधुकर बांगर वाहक (सांगोला) यांचा जखमीत समावेश आहे.
हैदराबाद - सोलापूर क्रमांक ६५ या राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ गतीने चालू असल्याने मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अपघात होत आहेत. मागील १२ वर्षापासून राष्ट्रीय महामार्ग काम चालू आहे. मात्र अनेक ठिकाणचे सर्व्हिस रोड, पूल, गाव अंतर्गत रस्ते यांची कामे अपूर्ण आहेत. राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? हा मोठा प्रश्न आहे. तर सततच्या रस्ता खराब होण्यामुळे या कामाच्या दर्जावरती प्रश्न उठवले जात आहेत. अनेक ठिकाणी जुने पुल वापरूनच या राष्ट्रीय महामार्गाचे काम केले जात आहे. आता तरी महामार्ग प्राधिकरण लक्ष देणार का हे पाहणे गरजेचे आहे.