

उमरगा : शहर व तालुक्यातील नागरिकांचे वेगवेगळ्या ठिकाणी गहाळ झालेले मोबाईल फोन शोधून काढण्यात उमरगा पोलिसांना यश मिळाले आहे. विविध कंपन्यांचे एकूण 15 मोबाईल सीईआयआर पोर्टलच्या प्रभावी वापरातून शोधून ते मूळ मालकांना परत करण्यात आले. मंगळवारी (दि 13) पोलीस ठाण्यातील वार्षिक तपासणी दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या हस्ते हे मोबाईल संबंधित नागरिकांना सुपूर्द करण्यात आले.
उमरगा शहरासह तालुक्यातील गावांमध्ये आठवडा बाजार, प्रवासा दरम्यान किंवा गर्दीच्या ठिकाणी महिला व नागरिकांचे मोबाईल गहाळ झाले होते. याबाबत उमरगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्या होत्या. मोबाईल हरवल्यानंतर अनेक नागरिक निराश झाले होते. मात्र पोलिसांनी तक्रारींची गांभीर्याने दखल घेत सीईआयआर पोर्टलवर नोंद करून सतत लोकेशन ट्रॅकिंग व तांत्रिक विलेषणाच्या आधारे हे मोबाईल शोधून काढले. या कारवाईमुळे केवळ उमरगा तालुक्यातीलच नव्हे तर इतर जिल्ह्यांतील नागरिकांनाही दिलासा मिळाला.
गहाळ मोबाईल पुन्हा मिळाल्याने संबंधित नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला असून पोलिसांबद्दल विश्वास अधिक दृढ झाला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून हरवलेले मोबाईल परत देण्याची या वर्षातील ही पहिलीच कारवाई आहे. ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक रितू खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना आणि पोलीस उपअधीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी, पोहेकॉ राजेश वादे व पोकॉ संभाजी घुले यांच्या पथकाने केली.
उमरगा पोलीसांनी गहाळ झालेले 15 मोबाईल मूळ मालक अश्विनी कांबळे, गजानन बिराजदार, श्रीधर लोहार, जगदेवी अस्तगे, महेश कदारे, हिराचंद मुळे, प्रदीप भोसले, प्रविण गायकवाड आदींना परत केले.