

Zilla Parishad members boycott Panchayat Raj awards ceremony
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी आणि ग्रामीण जनता संकटात असताना लाखो रुपये खर्चुन पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्याच्या निर्णयावर जिल्हा परिषद सदस्या विद्या रमेश गायकवाड यांनी आक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत गुरुवारी (दि.१९) आयोजित विभागस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे.
जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, शेतीचे नुकसान आणि रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत भव्य सोहळे आणि सत्कार समारंभांवर सार्वजनिक निधी खर्च करण्याऐवजी दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी निधी वापरावा, अशी भूमिका गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकातून मांडली आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी होणाऱ्या खर्चाचा संपूर्ण तपशील प्रशासनाने सार्वजनिक करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. हा निधी दुष्काळग्रस्त भागातील पाणीपुरवठा, चारा छावण्या, रोजगार हमीची कामे आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी वापरण्याबाबत प्रशासनाने विचार करावा, असे त्यांनी म्हटले आहे.
पुरस्कार वितरण किंवा गावांच्या विकासकामांना आपला विरोध नाही. मात्र, जनता संकटात असताना सार्वजनिक पैशांचा अनावश्यक खर्च करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने खर्चाला प्राधान्यक्रम ठरवावा, असे आवाहनही गायकवाड यांनी केले.