

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेच्या नऊ शिक्षकांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. सार्वत्रिक बदली प्रक्रियेत खोटी माहिती दिल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी मंगळवारी (दि. २५) ही कारवाई केली. त्यामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषदेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात साडेआठ हजार शिक्षक कार्यरत आहेत. या शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्यांची प्रक्रिया ऑनलाईन पदध्तीने राबविण्यात आली. त्याआधी संवर्ग एक आणि संवर्ग २ मधील बदल्यांसाठी शिक्षकांकडून पोर्टलवर माहिती भरून घेण्यात आली होती. मात्र यामध्ये अनेक शिक्षकांनी चुकीची आणि खोटी माहिती भरली. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत पडताळणी केली. त्याचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्याकडे सादर करण्यात आला होता. काही शिक्षकांनी शाळांमधील अंतर चुकीचे दर्शविले, काहींनी रुजू होण्याची खोटी तारीख टाकली, काहींनी परस्पर विषय बदल केल्याचे दाखविले होते. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी मंगळवारी नऊ शिक्षकांना निलंबित केले. बदल्यांसाठी खोटी माहिती दिल्यास थेट निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाच्या १८ जून २०२४ रोजीच्या आदेशाने दिलेले आहेत. त्याआधारे ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जयश्री चव्हाण यांनी या कारवाईला दुजोरा दिला आहे.
यांच्यावर निलंबनाची कारवाई
नऊ निलंबित शिक्षकांमध्ये वेगवेगळ्या तालुक्यांत कार्यरत शिक्षकांचा समावेश आहे. यात रवींद्र धर्मा जाधव, भाग्यशाली भास्कर जगताप, जयश्री मारोती कस्तुरे, अलमास फातेमा हसन खान, सुरेखा काशिनाथ वाघ, अंजली नारायण महाजन, आऐशा सुलताना खान, निसार फातेमा जुबेर अहमद, कविता सुरेश अंबुसे यांचा समावेश आहे.