

पिशोर : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणावर खोटा गुन्हा दाखल करून त्याला धमकी दिल्यामुळे आलेल्या तणावातून करंजखेडा (ता.कन्नड) येथील तरुणाने (दि.१७) गळफास घेऊन जीवन संपवले. सचिन अण्णाराव वाघ (वय ३०) असे त्या तरुणाचे नाव आहे. कारागृह पोलिस दलात भरती झालेली तरुणी, तिचे वडील व तरुणीचे काही मित्र यांनी त्याला नोकरीला लागू न देण्याची धमकी दिली होती. तसेच खोटा गुन्हा दाखल केल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
मयत तरुण व तेजश्री पवार ही तरुणी सोबत भरतीची तयारी करत होते. तीन ते चार महिन्यापूर्वी तेजश्री ही कारागृह पोलिस नागपूर येथे भरती झाली. दरम्यानच्या काळात सचिन हा तेजश्रीला संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता परंतु तेजश्री त्याला प्रतिसाद देत नव्हती. तरीसुद्धा सचिन वारंवार तेजश्रीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याने तेजश्रीचे वडील सुभाष पवार यांनी मंगळवारी (दि.१५) रोजी पिशोर पोलिस ठाण्यात सचिन विरुद्ध धमकावणे, शिवीगाळ करणे, त्रास देणे या आशयाची तक्रार दाखल केली होती.
बुधवारी (दि.१६) रोजी सचिन करंजखेडा येथे आला असता त्याने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचे त्याच्या पोलिस पाटील भावाला सांगितले. बुधवारी (दि.१६) रोजी सर्व जण झोपलेले असताना रात्री अडीच वाजताच्या सुमारास घराच्यांना सचिन घरात नसल्याचे आढळून आले. त्याचवेळी त्याच्या व्हॉट्सअॅपवर मी जीवन संपवत आहे असे स्टेटस दिसत असल्याचे आढळून आले. यामुळे कुटुंबातील सदस्यांनी त्याचा शोध घेतला असता रामेश्वर मंदिराजवळ एका लिंबाच्या झाडाला त्याने दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले.
पिशोर पोलिसांना याविषयी माहिती देताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सचिनला खाली उतरवून करंजखेडा येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले असता त्याला तपासून मृत घोषित करण्यात आले. या संदर्भात तेजश्री पवार, सुभाष पवार व एका अज्ञात व्यक्तीवर पिशोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.