

कन्नड : शहराजवळील कणकावती नगर येथे महावितरणच्या विजेच्या खांबाचा जोरदार धक्का लागून एका २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. २७) सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली. मुकेश बबनराव साळुंखे (वय २४) असे मृत तरुणाचे नाव आहे.
शिवसेनेचे शिवाजी थेटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश हा कणकावती नगर येथे आपल्या वृद्ध आई-वडिलांसोबत राहत होता. मोलमजुरी करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असे. शनिवारी मजुरी करून घरी परतत असताना वाटेतील महावितरणच्या विजेच्या खांबाचा त्याला अचानक जोरदार धक्का बसला. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील नातेवाईकांनी व नागरिकांनी त्याला तातडीने उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
मुकेश हा कुटुंबातील एकमेव कमवता व्यक्ती होता. त्याच्या निधनाने साळुंखे कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून, महावितरण कंपनीने या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शिवाजी थेटे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात झाली नव्हती.