

Young man brutally beaten up over love affair, attempted kidnapping
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : एका करिअर अकॅडमीच्या संचालकाने प्रेम प्रकरणाचे बिंग फुटू नये म्हणून एका तरुणाला तिघांच्या मदतीने बेदम मारहाण करीत अपहरणाचा प्रयत्न केला. मात्र ग्रामीण पोलिसांनी सतर्कता बाळगत नाकाबंदी केली व आरोपींचा डाव फसला. ही घटना तालुक्यातील केळगाव येथे शनिवारी (दि.६) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली.
दशरथ विठ्ठल जाधव (रा. मोढा खु. ह. मु. सिल्लोड) गणेश कृष्णा जगताप (रा. वडोदचाथा), गणेश सोन्नर्सिंग चव्हाण, प्रवीण लालचंद राठोड (दोघे रा. को-हाळा तांडा, ता. सिल्लोड) अशी आरोपींची नावे आहेत. तर अमोल गजानन मख (२०, रा. केळगाव) असे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्या गेलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी दशरथ जाधव याची सिल्लोड शहरातील भराडी नाक्यावर हिंदवी करिअर अकॅडमी आहे. यात फिर्यादी अमोल मख शिकायला होता. आरोपीने तरुणावर संशय घेऊन अकॅडमीतून काढले. तर संचालकाचे अकॅडमीतील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. यादरम्यान आरोपी दशरथ जाधवने फिर्यादी तरुणाला सदर मुलीला फोन करून तू मास्तरशी लग्न करणार आहे का? अशी विचारणा करण्यास सांगितले होते. तर या संभाषणाची ऑडिओ क्लिप फिर्यादीकडे होती.
ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, तर आपल्या प्रेम प्रकरणाचे बिंग फुटेल, अशी भीती आरोपीला होती. यातून आरोपी व फिर्यादीत वाद होता. याच वादातून शनिवारी को-हाळा तांडा येथील फिर्यादीचे मित्र गणेश चव्हाण, प्रवीण राठोड यांना फिर्यादीला केळगावच्या घाटात आणण्याचे आरोपीने सांगितले. तर आरोपी दशरथ जाधव व गणेश जगताप कारमधून (एमएच-४८-ए-९९१८) घाटात येऊन थांबले. वरील दोघे मित्र फिर्यादीला दुचाकीवरून घेऊन आले. फिर्यादीला आणताच आरोपींनी बेदम मारहाण केली व गाडीत कोंबून निघून गेले. या दरम्यान केळगाव येथील तीन-चार जण जात होते. त्यांनी ही घटना पाहिली. गावातील तरुण असल्याने त्यांनी ही माहिती तात्काळ ग्रामीण पोलिसांना दिली.
गणेश विसर्जन असल्याने पोलिस ग्रामीण भागात बंदोबस्त बजावत होते. माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे, विट जमादार अनंत जोशी, यतीन कुलकर्णी, रामेश्वर जाधव, तायडे, सतुके यांनी भराडीला नाकाबंदी केली. सदर कार येताच पोलिसांनी अडवली व आरोपींना कारसह ताब्यात घेतले. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपासा उपनिरीक्षक लहू घोडे करीत आहेत.
दरम्यान आरोपी दशरथ जाधव याच्यावर पुणे येथेही पेपर फुटीचा गुन्हा दाखल आहे. तर कोल्हापूर येथेही त्याने करिअर अकॅडमी सुरू केली होती. मात्र तेथेही त्याने अशाच उचापती केल्याने तेथील अकॅडमी बंद करून सिल्लोडला आला होता. आरोपींना रविवारी (दि.७) न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश सिल्लोड न्यायालयाने दिले, अशी माहिती पोलिसांनी दिली.