

कन्नड: तालुक्यातील चिंचखेडा (बुद्रुक) येथे एका तरुण शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. १) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. योगेश अर्जुन काळे (२८) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, गावाच्या लगत असलेल्या शेतात काळे कुटुंब राहत होते. पाच वर्षांपूर्वी त्यांनी शेतातील घरासाठी विद्युत महामंडळाकडे कोटेशन भरून मीटर घेतले होते. घरापासून पोलचे अंतर सुमारे ५०० फूट असल्याने त्यांनी वारंवार पोलची मागणी केली; मात्र महामंडळाने पोल न देता गावातील पोलवरून केबल (वायर) टाकून सध्या काम भागवा, असा सल्ला दिला. त्यानुसार गेली पाच वर्षे केबलद्वारेच वीजपुरवठा सुरू होता. ते नियमितपणे प्रत्येक महिन्याचे वीजबिल भरत होते.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे वायरवर कार्बन जमा झाल्याने घरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. तो सुरळीत करण्यासाठी योगेश काळे हे गावाजवळील पोलजवळ गेले असता, वायर हलविताना त्यांना जोराचा शॉक बसला. उपचारासाठी औराळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता डॉ. जयदीप झगरे यांनी त्यांना मृत घोषित केले.
संध्याकाळी पाच वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. योगेश यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व भाऊ असा परिवार आहे.