

Yashwantrao Chavan Centre Yuva Puraskar 2025
छत्रपती संभाजीनगर : समृद्ध समाजनिर्मितीसाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून शेती, युवक, महिला, शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रात खूप मोठे सामाजिक कार्य सुरू आहे. या माध्यमातून समर्पित भावनेने लक्ष केंद्रित करत, जिद्द, चिकाटी, मेहनत घेत, अडचणीत तग धरून राहत, सकारात्मक आणि सातत्य ठेवत काम करणारी ही आजची तरुण पिढी सर्वांसाठी प्रेरक आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने महाराष्ट्राच्या सर्वागीण विकासासाठी विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या युवक-युवतींना दिल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार सोहळ्याचे शुक्रवारी एमजीएम परिसरातील रुक्मिणी सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते. यावेळी टोपे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या जिल्हा केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम होते. तर, मानद कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, कार्यकारिणी सदस्य डॉ. अपर्णा कक्कड, कवी दासू वैद्य आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना टोपे म्हणाले, आज विविध क्षेत्रात काम करणारे हे सगळे तरुण समाजाच्या भल्यासाठी काम करत आहेत. विशेषत: सामान्य नागरिकांचे जीवन सुखमय आणि आनंददायी होण्यासाठी ही तरुणाई आपापल्या क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपत सातत्यपूर्ण कार्यरत आहे. या सर्वांनी आपल्या कामांतून ‘नोकरी मागणारे होण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा’ हाच संदेश दिलेला आहे.
भारताला संतांच्या विचारांची फार मोठी परंपरा आहे. भगवान बुध्दाने उदात्त धर्माची दिलेली शिकवण जगासाठी मार्गदर्शक ठरलेली आहे. अशा समृद्ध विचारपरंपरा लाभलेल्या देशात जाती-धर्माच्या नावाने होणारे वाद बघून मन विषण्ण होतं. वडीलधाऱ्या माणसाने तरुणांना याविषयी योग्य मार्ग दाखवला पाहिजे. आपण कुठे चुकत आहोत, हे दाखवून दिले पाहिजे. यशवंतराव चव्हाण सेंटरने यासाठी पुढील काळात काम केले पाहिजे. संधीची नवनवीन क्षितिजे उपलब्ध होत असताना आता या तरुणांनी न थांबता, अथक परिश्रमातून नवनवीन विक्रम स्थापित केले पाहिजेत, असे यशवंतराव चव्हाण सेंटरच्या जिल्हा केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम यांनी यावेळी सांगितले.
मानद कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ यावेळी बोलताना म्हणाले, आज यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार प्राप्त करणारे सगळे युवक-युवती समाजाच्या भल्यासाठी अनेक महत्वाच्या विषयावर काम करत आहेत. माध्यमे याची दखल घेत असतील किंवा नाही. मात्र, आज यशवंतराव चव्हाण सेंटरने यांच्या कामाची दखल घेतली आहे. आपली आवड जोपासत ही सगळी तरुण मंडळी आपले सर्वस्व झोकून देऊन काम करत आहेत. या अशा समाजातील तळागाळात काम करणाऱ्या व्यक्तींमुळे महाराष्ट्र चालतो आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक नीलेश राऊत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशश्री मुळे यांनी केले तर आभार विभागप्रमुख संतोष मेकाले यांनी केले.