ज्येष्ठ साहित्यिक, ‘पाचोळा’कार रा. रं. बोराडे काळाच्या पडद्याआड

साहित्य क्षेत्रात सलग सहा दशके यशस्वी कार्य
Raosaheb Rangnath Borade
ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांचे आज निधन झाले.(file photo)
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : प्रख्यात लेखक, ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगनाथ बोराडे तथा रा. रं. बोराडे (Raosaheb Rangnath Borade) यांचे आज मंगळवारी (दि. ११) रोजी सकाळी ८:३० वाजता वृद्धापकाळाने एमजीएम रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सुलभा बोराडे, मुली प्रेरणा, तृप्ती, मंजूश्री, अरुणा आणि नातवंडे असा परिवार आहे.

ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग अंतर्गत २०२४ करिता विं.दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. त्यांच्या ‘पाचोळा’ या कादंबरीवर एमजीएम विद्यापीठाच्या स्कुल ऑफ फिल्म आर्ट्स'ने पाचोळा कादंबरीवर आधारित चित्रपटाची निर्मिती केली होती. अशाच त्याच्या आणखी इतर ३ कादंबऱ्यांवर आधारित चित्रपटांची निर्मिती झालेली आहे.

इयत्ता १० वीत असताना त्यांनी आपल्या लेखनास सुरुवात केली. साधी-सोपी आणि वाचकांच्या हृदयाचा ठाव घेणारी शैली हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या कथांचा शेवट धक्कादायक असतो. शेवटच्या धक्क्याने वाचक स्तंभित होतात. त्यांच्या कथांमधून ग्रामीण भागातील वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती भेटतात. त्यांनी लिहिलेल्या 'पाचोळा’ या कादंबरीवरून त्यांना पाचोळाकार बोराडे हे नामाभिधान मिळाले होते. विशेषत त्यांच्या साहित्यातून मराठवाडी बोलीचे अनेक विशेष प्रगट झाले आहेत.

‘पाचोळा’ आणि ‘वसुली’ या कथांनी मराठी साहित्याला नवे आयाम दिले. त्यांच्या लेखणीतून ग्रामीण समाजाचे सुख-दुःख, संघर्ष आणि आशा-आकांक्षा जिवंतपणे समोर येण्यास मदत झाली. त्यांनी आपल्या साहित्यातून सामान्य माणसांच्या कथा मांडल्या असून त्यांच्या जाण्याने साहित्य विश्वाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.

लातूरच्या काटगाव गावातील शेतकरी कुटुंबात जन्म

रा. रं. बोराडे यांचा जन्म २५ डिसेंबर १९४० रोजी लातूर जिल्ह्यातील 'काटगाव' सारख्या छोट्याश्या गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. काटगाव येथे चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी गाव सोडले. त्यांनी माढा, बार्शी, सोलापूर, औरंगाबाद अशा शहरातून आपले शिक्षण पूर्ण केले. नोकरीच्या निमिताने त्यांचे वास्तव्य नागरी भागात होते; तरी मराठवाड्यातील ग्रामीण जीवनाने व तिथल्या ऋतूचक्राने घडविलेला त्यांचा मन:पिंड कायम राहिला.

कथासंग्रहांतून कष्टकऱ्यांच्या दु:खाला वाचा फोडली

१९५७ साली त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली. तिथंपासून ते आजतागायत त्यांचा सृजनात्मक लेखनप्रवास अविरत चालू होता. प्रदीर्घ लेखनकाळ हे वाड्मयविश्वातील अपवादभूत उदाहरण आहे. त्यांच्या १९६२ साली आलेल्या ‘पेरणी’ते‘ताळमेळ’,‘मळणी’,‘वाळवण’,‘राखण’,‘गोधळ’,‘माळरान’,‘बोळवण’,’वरात’,‘फजितवाडा’, ‘खोळंबा’,‘बुरुज’,‘नातीगोती’,‘हेलकावे’,‘कणसं आणि कडबा’ यासारख्या कथासंग्रहांनी मराठवाडी कष्टकऱ्यांच्या दु:खाला भाषिक आविष्कारातून सार्थ वाचा फोडली.

रा.रं.बोराडे यांची कथाकार ही ‘नाममुद्रा’ ठळक झाल्यानंतर एकाच वाड्मय प्रकारात ते रमले नाहीत. कादंबरी, नाट्य, विनोदी, समीक्षा, बालसाहित्य अशा बहुअंगी लेखनातून ग्रामसमुहातील माणसं, त्यांची ‘नातीगोती’, त्यातील ‘मरणकळा’, ‘शिवारा’ बाहेरील ‘पाचोळा’गत त्यांचे अस्तित्व, सतत ‘माळराना’वर जीवघेणे कष्ट उपसूनही कृषक समाजाच्या नशिबी आलेले ‘रिक्त-अतिरिक्त’पण, कितीही ‘पेरणी’ आणि ‘मळणी’ केली तरी ‘चारापाणी’ याचे ‘सावट’ डोक्यावर नित्याचेच. अगदी इथल्या स्त्रीच्या नशिबी आमदारपद आलं तरीही ती ‘आमदार सौभाग्यवती’ राहील हे सांगणे तसे कठीणच! म्हणून शेवटी ‘कश्यात काय आणि फाटक्यात पाय’ असं म्हणत नियतीचा दु:खभोग म्हणून जगू पाहणारी या दुष्काळी प्रदेशातील माणसं त्यांच्या उभ्या आडव्या सांस्कृतिक परिप्रेक्ष्यासह मराठवाडी बोलीतून त्यांनी आविष्कृत केली. हे त्यांचे योगदान लक्षणीय होय.

रा. रं. बोराडे यांनी विशुद्ध कलावादी भूमिका ओलांडून पुढे टोकदार सामाजिक प्रश्न व समाजातील ज्वलंत वास्तव अभिव्यक्त करु लागले होते. मराठवाडी माणसे, स्त्रीशोषण, कौटुंबिक ताणतणाव, गरिबी, दुष्काळ, शेतीभाती, निसर्ग, देव, दैवते, श्रद्धा-अंधश्रद्धा, ग्रामपरंपरा, नातीगोती आणि त्यातील राजकारण, माणसांचे बेरकीपण त्यांच्या स्वभावधर्मासह रेखाटन हा त्यांच्या विविधांगी लेखनाचा स्थायीभाव ठरला.

ते फक्त लिहित नव्हते तर...

रा. रं. बोराडे गेली सहा-साडेसहा दशके वाड्मय व्यवहार हेच आपले ‘जीवित’ मानून वाड्मयसेवा करणारे ‘तपस्वी’ होते. नव्या पिढीच्या लेखनाबाबत आस्थेने बोलणारे, वाचणारे आणि त्यातील शक्तीस्थळे मोठ्या मनाने मान्य करणारे त्यांच्यासारखे लेखक आजच्या काळात दुर्मिळ झालेत. गाव-खेड्यातून लिहिणाऱ्या नंतरच्या पिढ्या त्यांच्याकडे पाहून लिहित्या झाल्या ही बाब नाकरता येत नाही. त्यांनीही यापिढ्यांना आस्थेने जोडून घेतले. शेतकरी समाज व संस्कृती तसेच आज विकलांग होत जाणारी कृषकव्यवस्था, कृषिकेंद्रित समूहांचे प्रश्न हे त्यांच्या चिंतनाचा, आस्थेचा आणि सृजनाचा कायम केंद्रबिंदू राहिला होता. ग्रामीण साहित्य आणि ग्रामीण साहित्य चळवळ वृद्धिंगत करण्यात त्यांचा मौलिक सहभाग राहिला आहे. ते फक्त लिहित नव्हते तर लिहित्या हाताना ‘बळ’ देत होते.

साहित्य संमेलनांची अध्यक्षपदे भूषविली

रा. रं. बोराडे यांच्या वाङमयीन कार्याचा सर्व साहित्य संस्थांसह महाराष्ट्र शासन, विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या संस्थांनी पुरस्कार आणि सन्मानांनी वेळोवेळी गौरव केलेला आहे. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठीय अभ्यासक्रमात त्यांचे लेखन समाविष्ट झालेले आहे. याचबरोबर जून १९८९ मध्ये हिंगोली येथे भरलेल्या १७ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदांसह विविध ग्रामीण तसेच इतर अनेकविध साहित्य संमेलनांची अध्यक्षपदे त्यांनी भूषविली आहेत.

वाड्मयीन कार्य नव्या पिढीला प्रेरक

रा. रं. बोराडे यांनी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळात काही काळ अध्यापनकार्य केल्यानंतर त्यांनी वैजापूर स्थीत विनायकराव पाटील महविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्यभार स्वीकारला होता. त्यांनतर ते महाविद्यालय वाड्मयीन चळवळीचे केंद्र म्हणून अनेक वर्ष राज्यभर चर्चेत होते, ते त्यांच्या उपक्रमशीलतेमुळेच. पुढे छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी महविद्यालय, परभणीचे शिवाजी महाविद्यालयांत प्राचार्य म्हणून आपण त्यांनी केलेले कार्य सर्वश्रुत आहे. तसेच अनेक संस्था, विद्यापीठे व महाराष्ट्र शासनाच्या बहुविध समितीचे सदस्य म्हणून त्यांचे कार्य विदित आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी असतांना त्यांनी केलेले कार्य प्रेरक असेच होते.

आधुनिक साहित्यात ज्यांनी वैशिष्टयेपूर्ण लेखनाने आपली 'नाममुद्रा' इतिहासावर कोरली, त्या नामवंताच्या मालिकेत रा.रं. बोराडे विभुषित आहेत. त्यांचे वाड्मयीन कार्य नव्या पिढीला प्रेरक आहे.

जन्म : २५ डिसेंबर१९४० रोजी लातूर जिल्ह्यातील 'काटगाव' सारख्या छोट्याश्या गावात एका शेतकरी कुटुंबात झाला.

मृत्यू : ११ फेब्रुवारी २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे वृद्धापकाळाने निधन.

भूषवलेली पदे

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष

१७ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

वैजापूर येथील विनायकराव पाटील महविद्यालयाचे प्राचार्य

देवगिरी महविद्यालयाचे प्राचार्य

परभणी येथील शिवाजी महाविद्यालयात प्राचार्य

महाराष्ट्र शासनाच्या बहुविध समितीचे सदस्य

पुरस्कार

१. विं.दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार (मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन)

२. उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती राज्य पुरस्कार(एकूण : ५ पुरस्कार)

३. फाय फाउंडेशन पुरस्कार

४. महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाची सन्मानवृत्ती

५. यशवंतराव चव्हाण पुरस्कार,अंबाजोगाई

६. आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार

७. मराठवाडा सेवा गौरव पुरस्कार

८. भैरूरतन दमाणी पुरस्कार

९. जयवंत दळवी पुरस्कार

१०. मराठवाडा साहित्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार

कार्यक्षेत्र : नाटक, साहित्य, विनोद, तत्त्वज्ञान, ब्लॉग

साहित्य प्रकार : कथा, कादंबरी, नाटक, समीक्षा, ब्लॉग

विषय : सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, ग्रामीण

चळवळ : ग्रामीण साहित्य चळवळ

साहित्यकृती : पाचोळा, आमदार सौभाग्यवती, नाती गोती, बुरूज, ‘पेरणी’ते‘ताळमेळ’,‘मळणी’,‘वाळवण’,‘राखण’,‘गोधळ’,‘माळरान’,‘बोळवण’,’वरात’,‘फजितवाडा’, ‘खोळंबा’,‘बुरुज’,‘हेलकावे’,‘कणसं आणि कडबा’, ‘वसुलीय.’

Raosaheb Rangnath Borade
आयुष्यात शांतताही महत्वाची, सत्तारांपाठोपाठ संजय शिरसाट यांचे राजकीय निवृत्तीचे संकेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news