

World Theatre Day 2025 | जागतिक रंगभूमी दिन : मराठवाड्यातील दुर्लक्षित तालुका अशी ओळख असणाऱ्या सोयगावामध्ये १२५ वर्षापूर्वी नाट्यचळवळीचा श्रीगणेशा झाला होता. अजिंठा खो-यात वसलेल्या सोयगावमध्ये लोटू पाटील यांच्या प्रेरणेने चालणारी संगीत नाटके पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लोक बैलगाडीने येत असा इतिहास आहे.
मराठवाडा प्रदेश हा निझामाच्या जोखडाखाली असताना सोयगावने मात्र रंगभूमी क्षेत्रात उंची गाठली होती. उर्वरित महाराष्ट्रात बालगंधर्वाचे युग अवतरले असताना सोयगावने लोटूभाऊ पाटील यांच्या रुपाने नटसम्राट दिला होता. लोटू पाटील यांचे वडील रामजी पाटील यांनी १९०४ साली श्रीराम संगीत मंडळाची स्थापना केली. वडिलांचा वारसा लोटू पाटील यांनी पुढे चालवला. नाटकावर जीवापाड प्रेम करणारे लोटू पाटील यांनी नाटकात भाग घेतच असत, शिवाय रामनवमीच्या काळात महिनाभर नाटके चालत.
प्रारंभीच्या काळात गावाजवळील रानावनात होणाऱ्या नाटकांना जागा मिळावी म्हणून लोटू पाटील यांनी गावात श्रीराम मंदिर बांधले. मंदिरासमोरील मैदानात नाटके रंगू लागली. १९२८ नंतर लोटू पाटील यांनी गावात नाट्यगृह बांधण्याचे ठरविले आणि नाटकासाठी लागणारे साहित्य इंग्लंड मधून मागवले. संगीत नाटक उंच शिखरावर असताना लोटू पाटील हे मुंबई, पुण्यातील कलावंतांना नाटकासाठी बोलावत असत. सधन असल्याने कलाकारांची निवास, भोजन, प्रवास व मानधन खर्च ते स्वतः उचलत.
चित्रपटांचा उदय झाल्यानंतर संगीत नाटकांना उतरती कळा लागली. बहुतांश संस्था कालौघात बंद पडत आसताना जयराम शिलेदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी मराठी रंगभूमी ही संस्था स्थापन केली. त्यांच्या सोबतीला असणाऱ्या अभिनेत्री प्रमिला जाधव यांच्याशी विवाह करण्याचे ठरल्यानंतर हा विवाह सोहळा पाटलांच्या पुढाकाराने सोयगाव येथील मंदिरात पार पडला आणि पुढे त्या जयमाला शिलेदार झाल्या. या विवाहाच्यावेळी ग्रामस्थांना आमरस भोजन दिल्याचे म्हटले जाते. १९४६ साली झालेला विवाह हा तत्कालीन परंपरा मोडून काढणारा होता. या लग्नात भाऊ, मामा,वडील या भूमिका लोटूभाऊंनीच निभावल्या.
लोटू पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव नारायणराव यांनी चळवळ चालविण्याचा प्रयत्न केला. पण कालांतराने चित्रपटांकडे रसिकांचा कल वाढल्याने नाटकांवरही परिणाम झाला. लोटू पाटील यांनी जमविलेले नाट्य साहित्य धूळखात पडण्याऐवजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यशास्र विभागाला द्यावे, असा विचार नारायणराव यांचे चिरंजीव व लोटूभाऊंचे नातू मंगेश काळे यांनी केला. २२ मार्च, २००० रोजी सर्व साहित्य त्यांनी एका विशेष समारंभात विद्यापीठाकडे दिले. या साहित्याचा विद्यापीठाने उपयोग केला नाही. हा दस्ताऐवज सापडत नसल्याचे मंगेश काळे यांनी या प्रतिनिधीला सांगितले. तलवार, ढाल, तबले, तंबोरे, पडदे आदी सामान त्यात होते, अशी माहिती त्यांनी दिली. लोटू पाटील यांनी उभारलेल्या नाट्यगृहाच्या जागी आपण त्यांच्या नावाने अलिकडे नाट्यगृह उभारले असून नाटके सुरु करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला.