

ठळक मुद्दे
भारतात श्वानदंशाच्या घटना : ३७ लाख
अमेरिकेत श्वानदंश घटना : ४५ लाख
जागतिक आरोग्य संघटनेने २०३० पर्यंत कुत्र्यांमुळे होणाऱ्या रेबीजमुळे मृत्यू पूर्णपणे थांबवण्याचे उद्दिष्ट
बेळगाव (छत्रपती संभाजीगनर) : जितेंद्र शिंदे
चल रं वाघ्या रडू नको पाया कुणाच्या पडू नको..
दुनिया जरी सारी उलटली, तरी मनाचा धीर तू सोडू नको...
दादा कोंडकेंच्या 'एकटा जीव सदाशिव' चित्रपटातील गाण्याच्या ओळी कुत्र्याला उद्देशून लिहिलेल्या आहेत. मात्र आज २०२५ मध्ये कुत्र्यांच्या बाबतीत 'थांब रं वाघ्या चावू नको' असे म्हणण्याची वेळ आली आहे.
कारण २०२३ पासून जागतिक स्तरावरच कुत्रे अधिक आक्रमक होत आहेत. जागतिक तापमान वाढ आणि अन्नाची वाढती टंचाई या दोन घटकांमुळे कुत्रे अधिक हिंस्त्र बनत चालले आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेने २०२४ च्या अहवालात म्हटले आहे. भारतातही भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढत असून, त्यावर रोख लावण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. तसेच भटक्या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी अन्न देण्यासही बंदी घातली आहे. भटक्या कुत्र्यांसाठी वेगळी व्यवस्था करण्याच्या सूचनाही न्यायालयाने दिल्या आहेत.
२०३० पर्यंत रेबीजमुळे मृत्यू पूर्णपणे थांबवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तर काहींनी भटकी कुत्री ही सामाजिक जबाबदारी आहे, असा सूर काढला आहे. २६ ऑगस्ट हा जागतिक श्वान दिन म्हणून साजरा केला जातो. कुत्र्यांची काळजी, त्यांच्या संरक्षण आणि पाळीव प्राण्यांच्या दत्तक घेण्याच्या महत्त्वाबाबत जागरूकता वाढवणे हा यामागचा उद्देश आहे.
कुत्रा जागतिक पातळीवर पाळीव प्राणी म्हणून मान्यता मिळून शेकडो वर्षे उलटली आहेत. तथापि, कुत्रा हा मूळ हिंस्त्र प्रजातीचा प्राणी. मांसाहार हाच त्याचा मुख्य आहार. तथापि, मानवाने त्याला माणसाळले आणि पाळीव बनवले. तरीही त्याची आक्रमक वृत्ती कधी ना कधी उचल खातेच. अन्नाची कमतरता, जागतिक तापमानात वाढ, अपुरी जागा, मोठ्या प्रमाणात वाढलेली पैदास यामुळे भटकी कुत्री आक्रमक होत आहेत. त्यामुळे जागतिक पातळीवर कुत्र्यांचे हल्ले वाढले आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, कुत्र्यांचे हल्ले आणि त्यामुळे होणारे परिणाम, विशेषतः रेबीजचा धोका, ही जागतिक स्तरावर गंभीर समस्या आहे. भारतात २०२४ मध्ये ३७ लाख कुत्र्यांच्या चाव्याच्या घटना नोंदवल्या गेल्या. अमेरिकासारख्या प्रगत देशात दरवर्षी सुमारे ४५ लाख लोकांना कुत्रे चावतात. आशिया आणि आफ्रिका खंडात दरवर्षी रेबिजमुळे ५९ हजार लोकांचा मृत्यू होतो. जागतिक आरोग्य संघटनेने २०३० पर्यंत कुत्र्यांमुळे होणाऱ्या रेबीजमुळे मृत्यू पूर्णपणे थांबवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
लोकांना कुत्र्यांच्या हल्ल्यांबाबत शिक्षित करणे, विशेषतः मुलांना भटक्या कुत्र्यांपासून दूर राहण्याची शिकवण देणे. कुत्र्यांचे लसीकरण आणि पैदास नियंत्रण कार्यक्रम राबवणे.
कुत्र्यांबाबत प्रेम, त्यांच्या निष्ठा आणि मानवाशी असलेल्या खास नात्याचा उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी २६ ऑगस्ट रोजी जागतिक श्वास दिवस साजरा केला जातो. जागतिक श्वान दिवसाची सुरुवात २००४ मध्ये अमेरिकेतील प्राणीप्रेमी कार्यकर्त्या कॉलिन पेज यांनी केली होती.