Sambhajinagar News : दिवाळीनंतर जलयोजनेच्या कामांना पुन्हा गती

कामगार परतल्याने वाढणार मनुष्यबळ : रखडलेल्या कामांचा आयुक्तांकडून आढावा
Sambhajinagar News
Sambhajinagar News : दिवाळीनंतर जलयोजनेच्या कामांना पुन्हा गतीfile photo
Published on: 
Updated on: 

Work on water projects to regain momentum after Diwali

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या नवीन जलयोजनेच्या कामांना दिवाळीनंतर पुन्हा गती देण्याची तयारी महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. सणाच्या सुटीनिमित्त गावी गेलेले कामगार आता कामावर परतत असल्याने विविध ठिकाणच्या कामांसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे संथगतीने सुरू असलेल्या कामांचा वेग वाढेल, असा विश्वास सोमवारी (दि. १६) महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी व्यक्त केला. रखडलेल्या कामांचा आढावाही घेतला जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Sambhajinagar News
New Gas Connections : नवीन गॅस कनेक्शन बंद असल्याने ग्रामीण ग्राहकांच्या अडचणीत वाढ !

नवीन जलयोजनेच्या कामांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ ऑक्टोबरला बैठक घेऊन प्रगतीचा आढावा घेतला होता. यापूर्वी शहरातील पाणीटंचाईची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन महापौर समीर राजूरकर यांनी केलेल्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांनी १५ जुलैला मुंबईत स्वतंत्र बैठक घेतली होती.

त्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे प्रधान सचिव रंगानायक यांनी शहरात येऊन प्रत्यक्ष कामांची पाहणी केली होती. जलयोजनेची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी टप्पेनिहाय आराखडा तयार करून सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले होते. या निर्देशांच्या अनुषंगाने ५ ऑक्टोबरच्या बैठकीत कामांच्या प्रगतीची तपासणी करण्यात आली.

Sambhajinagar News
Corporator Disqualification Case : नगरसेवक अपात्रता प्रकरणी आठ तक्रारींवर सुनावणी

अद्याप पूर्ण न झालेली कामे, तांत्रिक अडथळे आणि विलंबाची कारणे यावरही चर्चा झाली. मात्र, दिवाळीच्या काळात मोठ्या संख्येने कामगार गावी गेल्याने जलवाहिन्या टाकण्यासह अन्य पायाभूत कामांचा वेग कमी झाला होता. आता कामगारांची उपस्थिती वाढत असल्याने कामांची स्थिती सुधारण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून पुन्हा कामांचा आढावा घेण्याची तयारी केली जात आहे.

पाण्यासाठी यंदाची दिवाळी समाधानकारक

गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदाची दिवाळी शहरातील पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने समाधानकारक ठरली. सणाच्या दिवसांत पाणीपुरवठा खंडित होण्याचे प्रकार यंदा घडले नाहीत. यापूर्वी दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणातही एक-दोन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होत असे. मात्र, यंदा नागरिकांना पाण्यासाठी आंदोलन करावे लागले नाही, असे आयुक्त येडगे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.