

Woman who went to the bank to withdraw her pension was robbed right inside the bank
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा बँकेत जाऊन एका वृद्ध महिलेने पेन्शनचे २० हजार रुपये काढून काउंटर समोर खुर्चीवर बसून नोटा मोजू लागली. त्याचवेळी एका भामट्याने त्यांना खराब नोटा शोधून देतो अशी थाप मारून हातचलाखीने त्यातून ६ हजार ८०० रुपये काढून घेत गंडा घातला.
हा प्रकार मंगळवारी (दि.५) दुपारी १ वाजेच्या सुमारास एसबीआय बँक, बन्सीलाल नगर शाखेत घडला. फिर्यादी मालतीबाई काशिनाथ त्रिभुवन (८०, रा. देवळाई चौक) यांच्या तक्रारीनुसार, त्या बन्सीलाल नगर येथील एसबीआय बँकेच्या शाखेत पेन्शनचे पैसे काढण्यासाठी गेल्या.
२० हजार रुपये काढल्यानंतर त्या बँकेतच खुर्चीवर बसून नोटा मोजत होत्या. तिथे डोक्यात टोपी घातलेला ३० ते ३५ वयाचा भामटा आला. त्याने स्वतःकडील फाटक्या नोटा दाखवून अगोदर विश्वास संपादन केला.
त्यानंतर तुमच्या नोटमधील खराब नोटा शोधून देतो अशी थाप मारून ६ हजार ८०० रुपये काढून घेत पसार झाला. याप्रकरणी वेदांत नगर पोलिस ठाण्यात शनिवारी (दि.९) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.