

welcome Sant Eknath Maharaj Palkhi Dindi in Bodhegaon
चंद्रकांत अंबिलवादे
पैठण : जाता पंढरीच्या मार्गे काय वणूप सुखा मग घडे लाभ लक्षकोटी परब्रह्म होइल भेटी पंढरीच्या आषाढी वारीसाठी निघालेल्या शांतीब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी गुरुवारी (दि.१९) हादगाव (ता. शेवगाव) येथे दुसरा मुक्काम पूर्ण केला. तिसऱ्या मुक्कामासाठी नाथांच्या पालखी सोहळ्याने शुक्रवारी मार्गस्थ होऊन दुपारचा विसावा व भोजनासाठी बोधेगाव पंचक्रोशीत दाखल झाल्यावर या परिसरातील ग्रामस्थांनी पादुका पालखी मिरवणूक काढून वारकऱ्यांचे भव्य स्वागत केले. पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविक-भक्तांनी गर्दी केली.
बोधेगाव ग्रामस्थांच्यावतीने सोहळा प्रमुख नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले, योगेश महाराज गोसावी पालखीवाले यांचे स्वागत करण्यात आले. कुंडलिकराव घोरथळे, शेवगाव विभागाचे डी वायएसपी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, शिवाजी पवार, प्रल्हाद शिंदे, अनिल घोरतळे, प्रसाद पवार, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक भैय्यासाहेब घोरतळे, महादेव घोरतळे, मंडळ अधिकारी सुवर्णा वरकड, तलाठी विकास बेडके, ग्रामविकास अधिकारी उद्धव जाधोर यांची उपस्थिती होती.
सोहळ्यात आलेल्या वारकऱ्यांना ठिकठिकाणी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. नाथाच्या सोहळ्यांनी दुपारचा विसावा घेतल्यानंतर तिसऱ्या मुक्कामासाठी पालखी सो-हळा बालमटाकळी, बाडगव्हाण, लाड जळगाव, शेकटे मार्गे सायंकाळी भगवान गडाच्या पायथ्याशी असलेल्या कुंडल पारगाव येथे दाखल झाल्यावर सरपंच धनंजय गरकळ, बबनराव गरकळ, भाऊसाहेब गरकळ, भागवत गरकळ, पोलिस पाटील बबनराव गरकळ यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले आहे.
श्रीसंत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे पहिले रिंगण शनिवारी दुपारी मिडसांगवी येथील रिंगण सोहळा मैदानावर संपन्न होणार आहे. दरम्यान, पालखी सोहळ्याचा शनिवारी (दि.२१) चौथा मुक्काम मुगसवाडे या पंचक्रोशीत होणार आहे.
संताच्या परंपरेत आषाढी वारी सोहळ्यासाठी पायी दिंडी सोहळ्यात जाणाऱ्या पालखी मार्गावर असलेल्या श्रीसंत भगवान बाबा यांच्या पावन भूमीमध्ये श्रीसंत एकनाथ महाराज व श्रीसंत भगवान बाबा यांचा संतभेट सोहळा शनिवारी (दि.२१) मोठ्या उत्साहात होणार आहे. यावेळी गडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री गडाच्यावतीने पालखी सोहळा प्रमुख नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले यांचा सन्मान करण्यात येईल.