New water supply scheme : २५०० च्या जलवाहिनीचे पाणी आजपासून जलकुंभात येणार

मनपा आयुक्तांनी केली कामाची पाहणी, ३० एमएलडी वाढीव पाणी मिळणार
New water supply scheme
New water supply scheme : २५०० च्या जलवाहिनीचे पाणी आजपासून जलकुंभात येणारfile photo
Published on
Updated on

Water from the 2500mm pipeline will start flowing into the water storage tank from today

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नवीन पाणीपुरवठा योजनेतून शहराला १२ जूनपासून वाढीव पाणी द्या, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. परंतु, ऐनवेळी हा मुहूर्तही हुकला. त्यामुळे सोमवारी (दि.१५) महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी संपूर्ण कामाची पाहणी करून वाढीव पाणी सुरू करण्याचे निर्देश महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला दिले. त्यानुसार आजपासून नव्या २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून शहरातील जुन्या जलकुंभांमध्ये पहिल्या टप्प्यातील २०० पैकी ३० एमएलडी वाढीव पाणी दाखल होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.

शहरवासीयांना दररोज मुबलकप्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी अमृत २ योजनेतून २७४० कोटी रुपये खर्चुन जलकुंभ, जलशुद्धीकरण केंद्र, पंपगृह, जॅकवेल आणि जायकवाडी धरण ते नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान नवीन २५०० मिमी व्यासाची जलवाहिनीसह शहराअंतर्गत तब्बल १८०० किलो मीटर लांबीच्या वितरण वाहिन्या टाकण्यात येत आहे.

मागील पाच वर्षांत एमबीआर, ३९२ एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र, पंपगृह, जॅकवेल आणि जायकवाडी धरण ते नक्षत्रवाडी या ३८ किलोमीटरपर्यंत नवीन २५०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे नव्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी २३ मार्चपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीकडून प्रयत्न सुरू आहेत.

उच्च न्यायालयाने १२ जूनपासून शहराला वाढीव पाणीपुरवठा सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मागील महिनाभरापासून हा मुहूर्त गाठण्यासाठी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, मनपा आयुक्त अमोल येडगे, एमजेपीच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु काही कामे अपूर्ण राहिल्याने हा मुहूर्तही हुकला.

दरम्यान, सोमवारी मनपा आयुक्त येडगे यांनी संपूर्ण कामाची पाहणी केली. सातारापर्यंत जलवाहिनी, जलशुद्धीकरण केंद्राला भेट दिली. त्यानंतर पाणी उपसा सुरू करून आज मंगळवारपासून शहरात वाढीव पाणी देण्यास सुरुवात करा, असे आदेश एमजेपीला दिले. त्यानुसार आजपासून शहरातील जलकुंभात जून्या जलवाहिन्यातून वाढीव ३० ते ४० एमएलडी पाणी दाखल होण्याची शक्यता आहे.

आयुक्तांनी दिले निर्देश

जायकवाडी धरणातून नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रात पाणी घेण्यास सुरुवात करा.

येत्या दोन दिवसांत १५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीत पाणी घेण्यात यावे. त्यासोबतच जलवाहिनी स्वच्छ करण्यात यावी.

जुन्या एमबीआरद्वारे जुन्या जलवाहिनीतून शहरातील जलकुंभात वाढीव ३० ते ४० एमएलडी पाणी आणण्यात यावे.

१७ जूनपासून १५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून शहरात पाणी आणणे सुरू करावे.

सातारातील जलकुंभ पूर्ण करा

शहराच्या नो नेटवर्क भागात मोडणाऱ्या सातारा-देवळाई परिसरात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. हा परिसर २०१६ सालापासून महापालिका हद्दीत आला आहे. त्यामुळे सोमवारी आयुक्त अमोल येडगे यांनी या परिसराची पाहणी केली. तसेच येथील बापळापूर, हरिओमनगर, अमीरनगर, सुधाकरनगर या चार ठिकाणच्या जलकुंभांपैकी दोन जलकुंभाचे काम पूर्ण झाले आहेत. उर्वरित जलकुंभाचे काम पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी एमजेपीला दिले. जलकुंभ पूर्ण होताच पाणीपुरवठा सुरू होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news