

छत्रपती संभाजीनगर : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वक्फ सुधारणा विधेयक कायदा राज्यात लागू करणार नाही, असे जाहीर विधान करून मुस्लिम समाजाला विद्रोह करण्यासाठी भाग पाडले. लोकसभेत आणि राज्यसभेत बहुमताने मंजूर झालेल्या कायद्याचे पालन न करणे हे विधान अवैधानिक आणि विद्रोही आहे. अशा प्रकारचे शासन त्वरित बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद क्षेत्र मंत्री गोविंद शेंडे यांनी केली आहे.
विश्व हिंदू परिषद व विविध हिंदुत्ववादी संघटनातर्फे याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, धर्म जागरण मंच, भारतीय किसान संघ, महाकाल प्रतिष्ठान, भारतीय मजदूर संघ, अभिनव गणेश मंडळ, ब्राह्मण महिला मंच, यासह अनेक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. विश्व हिंदू परिषद मंदिर अर्ज पुरोहित आयामाचे देवगिरी प्रांत संपर्कप्रमुख राजीव जहागिरदार यांनीही यावेळी बोलताना कायद्याच्या चौकटीत काम न करणाऱ्या आणि मुस्लिम जिहादी प्रवृत्तीच्या लोकांना हिंदूंच्या विरोधात भडकवणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे सरकार खाली खेचावे. तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी. तसेच हिंदूंनी मुर्शिदाबादमधून पलायन केले आहे. त्यांना पुनश्च त्यांचे निवासस्थान बांधून द्यावे, अशी मागणी केली. यावेळी गणेश मोकाशी, सुशील भारुका, अभिषेक कादी, सुभाष कुमावत, ज्ञानेश्वर जाधव, धनंजय पुंड, राज डावरे, सचिन राहणे, अमित जयस्वाल, विजया कुलकर्णी, सारंग जोशी, रुपेश बंगाळे, रवींद्र कुलकर्णी, प्रतीक शिरसे, उदय देशपांडे, अतुल सिंग, तवर अक्षय जोशी, श्रीरंग फरकडे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.