

निलंगेकरांना सीएम करण्यात मोठा वाटा
डॉ. शंकररराव राख, बोराडे यांना मंत्रिपदे
जायकवाडी प्रकल्प पूर्ण होण्यासाठी प्रयत्न
संभाजीनगरच्या मुलीसाठी नियमच बदलला
छत्रपती संभाजीनगर : वसंतदादा पाटील (Vasantdada Patil) यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी घेतलेला ‘राजसंन्यास’ हा नेहमीच चर्चेचा ठरला. परंतु हा राजसंन्यास घेण्यासाठी त्यांना तत्कालिन मुख्यमंत्री आणि मराठवाड्याचे ज्येष्ठ नेते शंकरराव चव्हाण यांनी भाग पाडले होते. अर्थात, दोन वर्षानंतर पक्षहितासाठी वसंतदादा राजकारणात परत आले आणि त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध करीत चार वेळा मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली हे विशेष.
वसंतदादा पाटील यांच्या पुण्यतिथी दिनी त्यांच्या चरित्राचा आढावा घेतला असता मराठवाड्याशी संबंधित अनेक बाबी लक्षात येतात. त्यातील ठळक म्हणजे जायकवाडी धरण, मराठवाडा आणि प. महाराष्ट्राला जोडणाऱ्या मिरज- पंढरपूर रेल्वे मार्गाचे रूंदीकरण आणि शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना दिलेले मुख्यमंत्रीपद या होत.
वसंतराव नाईक मंत्रिमंडळात (1972) वसंतदादांकडे पाटबंधारे आणि वीज ही खाती देण्यात आली होती. नाईकानंतर नागपूर कराराचा आग्रह धरीत मुख्यमंत्री झालेल्या शंकरराव चव्हाण मंत्रिमंडळात (1975) दादांचे दुसऱ्या क्रमांकाचे स्थान कायम राहिले होते. त्यांना पाटबंधारे, उत्पादन शुल्क, पाणीपुरवठा, आदिवासी विकास आदी खाती सोपविण्यात आली. पाटबंधारे खात्याचे मंत्रीपद आल्यानंतर त्यांनी पाण्याचे नियोजन, ऊस व इतर अन्नधान्य उत्पादन वाढावे म्हणून उपाययोजना, खुजगाव, काळम्मावाडी धरण योजना यशस्वी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. वसंतदादांची लोकप्रियता ही शंकररावांपेक्षा पूर्वीपासूनच जास्त होती. त्यात कामामुळे ते अधिक लोकप्रिय होत असल्याचे लक्षात येताच शंकरराव चव्हाण यांनी वसंतदादा आणि मधूकरराव चौधरी यांना नोव्हेंबर 1975 मध्ये मंत्रिमंडळातून वगळले. वसंतदादा हे वरकरणी शांत राहिले तरी त्यांना हा अपमान सहन झाला नाही. मंत्रीपद गेल्यानंतर वसंतदादांनी सरकारी बंगला सोडला आणि ते सरळ महालक्ष्मी एक्सप्रेसने सांगलीकडे रवाना झाले आणि शेतीकडे लक्ष देवू लागले. 1977 पर्यंत खऱ्या अर्थाने ते विजनवासात राहिले. परंतु 77 च्या निवडणुकीत इंदिरा गांधींसह अनेक नेते पराभूत झाल्यानंतर ते पुन्हा राजकारणात सक्रिय झाले. (संदर्भ : वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित विधानपरिषदेने व्यक्त केलेल्या कृतज्ञता प्रस्तावातील आमदारांची भाषणे). वसंतदादा मुख्यमंत्री असताना झालेल्या पुलोद प्रयोगात शंकरराव चव्हाण यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र समाजवादी काँग्रेसने शरद पवारांच्या बाजूने उभे राहणे पसंत केले, हे उल्लेखनीय.
राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने ‘महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदादा’ (लेखक : राजा माने) या प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात सात जानेवारी, 1973 रोजी तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी या जायकवाडी धरण बघण्यासाठी आल्या होत्या, तेव्हा त्यांच्यासोबत तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि पाटबंधारे मंत्री वसंतदादा पाटील सोबत होते, असे नमूद करण्यात आले आहे. बार्शी लाईट रेल्वे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर- मिरज - लातूर नॅरोगेजचे रूंदीकरण व्हावे म्हणून वसंतदादांनी तत्कालिन रेल्वेमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या उपस्थितीत रेल्वे परिषद घेतली होती, असा संदर्भ काही दस्ताऐवजांत आहे. वसंतदादा यांनी आपल्या चार मंत्रिमंडळात जालन्याला डॉ. शंकरराव राख यांच्या रूपाने प्रथमच मंत्रीपद दिले. याशिवाय परतूरचे आ. रामप्रसाद बोराडे यांनाही दोनवेळा संधी दिली. सुंदरराव सोळंके, शिवाजीराव पाटील निलंगेकर, बाबूराव काळे या मराठवाड्यातील नेत्यांनाही त्यांनी मंत्रिमंडळात समाविष्ट केले होते.
राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत ज्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दोन क्रमांकावर आहे, त्या आमदाराला उमेदवारी न देण्याचा निर्णय झाला होता. त्यात निलंग्याचा समावेश असल्यामुळे वसंतदादांचे समर्थक शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना उमेदवारी नाकारली गेली व त्यांचे चिरंजिव दिलीप पाटील आमदार झाले. दरम्यानच्या काळात प्रदेशाध्यक्ष प्रभा राव यांची नियुक्ती करताना आपल्याला विश्वासात घेतले नाही म्हणून दादांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा मागे घ्यावा म्हणून राजीव गांधी यांनीही प्रयत्न केले, पण ते फोल ठरले. शेवटी दादा म्हणतील तो मुख्यमंत्री असा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींनी पाठविल्यावर दादांनी निलंगेकरांचे नाव सुचविले. ‘ दिल्लीकरांनी ज्यांचे तिकीट कापले, त्यांना मी मुख्यमंत्री केले’ अशी प्रतिक्रिया वसंतदादांनी तेव्हा नोंदविली होती.
सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी कायदा कसा बदलता येतो, हे दादांनी महाराष्ट्राला शिकवले. दादा मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर एका जिल्हा परिषदेतून दुस-या जिल्हा परिषदेत कर्मचा-याची बदली होत नव्हती. एका स्वातंत्र्य सैनिकाच्या मुलीचे लग्न ठरले. मुलगा पुण्यात, मुलगी संभाजीनगर जिल्हा परिषदेत. बदलीची मागणी झाली. बदली करता येत नाही, असे सांगण्यात आले. विषय दादांपर्यंत गेला. दादांनी संबंधित खात्याच्या सचिवाला बोलावले. सचिवाने सांगितले, ‘दादा, आपला नियम असा आहे की, एका जिल्हा परिषदेतून दुस-या जिल्हा परिषदेत बदली होत नाही.’ दादा म्हणाले, ‘म्हणून तर तुम्हाला बोलावले. आजपासून एका ‘जिल्ह्यातून’ दुसऱ्या ‘जिल्ह्यात’ बदली करता येईल, असा प्रस्ताव तयार करून माझ्याकडे आण आणि माझी सही घे..’ त्याच दिवशी संध्याकाळी शासनाने तसा निर्णय जाहीर केला. जे करायचे ते सामान्य माणसाच्या हिताचे असेल तर लगेच करायचे या दादांच्या स्वभावामुळे लग्नाची गोष्टही त्यांनी निकाली काढली.