

छत्रपती संभाजीनगर: अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले वंदे भारत एक्स्प्रेसचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेतला असून मुंबई-जालना वंदे भारत एक्स्प्रेस आता २६ ऑगस्टपासून नांदेड येथून धावणारआहे. यामुळे वेळापत्रक विस्कळीत झाले असून, या निर्णयाने येथील प्रवाशांत नाराजी पसरली आहे.
छत्रपती संभाजीनगर औद्योगिक तसेच पर्यटनाची राजधानी असूनही येथून लांब पल्ल्याची एकही रेल्वे नाही. नुकतीच सुरू झालेली वंदेभारत एक्स्प्रेस ही जालना येथून सुरू होती. त्यामुळे येथील उद्योजक आणि व्यापाऱ्यांसाठी सोयीची झाली होती. आता तिचा विस्तार नांदेडपर्यंत केल्याने येथील वेळेतही बदल झाला आहे. त्याचबरोबर येथील आसन कोट्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
रेल्वेच्या निर्णयामुळे छत्रपती संभाजीनगर व परिसरातील प्रवाशांसह उद्योजकांत नाराजी पसरली आहे. या विस्ताराला येथून मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. या विरोधाला न जुमानता रेल्वे प्रशासनाने वंदे भारत एक्स्प्रेसचा विस्तार नांदेडपर्यंत केला आहे.
आतापर्यंत वंदे भारत एक्स्प्रेस ही ८ डब्यांची होती. हिचा विस्तार नांदेडपर्यंत करण्यात आल्याने डब्यांच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे. आता या एक्स्प्रेसला २० डबे राहणार आहेत. डब्यांची संख्या वाढल्याने कोणत्याही स्टेशनवरील आरक्षण कोट्यात कपात होणार नसल्याचा दावा रेल्वेच्या वतीने करण्यात आला आहे.
नांदेड-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस बुधवार वगळता दररोज सकाळी ५ ला नांदेड येथून निघणार आहे, पुढे परभणी येथे, जालना, छत्रपती संभाजीनगरला सकाळी ८.१५ पोहचेल. जी की सध्या दररोज ५.५० वाजता पोहचत होती. विस्तारांमुळे सव्वा दोन तासांपेक्षाही जास्त उशिराने येणार असल्याने पुढील प्रवास हा विस्कळीत होणार आहे. ती मुंबई सीएसटी येथे दुपारी २.२५ ला पोहो-चणार असल्याने दिवसभराची कामे होणार नाहीत. दरम्यान परतीचा प्रवास तिचा मुंबई येथून दुपारी १.१० वाजता निघणार आणि छत्रपती संभाजीनगर येथे सायंकाळी ७.५ वाजता तर नांदेड येथे रात्री १०.५० वाजता पोहचणार आहे.