

गंगापूर : गंगापूर तालुक्यातील रांजणगाव नरहरी शिवारातील खदानात पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची अत्यंत दुःखद घटना शुक्रवारी (11 ऑक्टोबर) दुपारी घडली. मयत दोघेही वैजापूर तालुक्यातील भगूर येथील असून ते एकाच शाळेतील व एकाच वर्गातील मित्र होते. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मयूर किशोर मोईन (वय १५) आणि साहिल संतोष झाल्टे (वय १५) हे दोघेही महालगाव न्यू हायस्कूलमध्ये इयत्ता ९ वी मध्ये शिकत होते. आज शाळेला दुपारी सुट्टी असल्यामुळे त्यांनी रांजणगाव नरहरी येथील एका खाजगी खदानाजवळ पोहण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, खदानातील पाण्याची खोली लक्षात न घेता ते खोलवर गेले आणि बाहेर येऊ शकले नाहीत.
साधारण दुपारी दोन वाजेच्या सुमारास काही स्थानिकांनी खदाणीच्या काठावर कपडे, चपला, शालेय दप्तर व पुस्तके पाहून शंका व्यक्त केली. ग्रामस्थांनी तात्काळ शिल्लेगाव पोलीस स्टेशन व अग्निशमन विभागाला माहिती दिली. पोलिस नाईक विगोत यांनी फायर कंट्रोल रूमला सूचित केले. त्यानंतर पदमपुरा अग्निशमन केंद्राचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. अशोक एन. खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधिकारी श्री. विजय राठोड, ड्युटी अधिकारी श्री. लक्ष्मण कोल्हे, जवान दिनेश मुंगसे, छत्रपती केकान, विशाल घरडे, प्रणाल सूर्यवंशी, सचिन शिंदे, मनसूबराव सपकाळ यांनी मिळून शोधमोहीम राबवली. तब्बल तासभर चाललेल्या प्रयत्नांनंतर दोघांचे मृतदेह पाण्याखालून शोधून काढण्यात आले व पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
या घटनेनंतर मृत मुलांच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. गावातील नागरिक, शाळेतील शिक्षक व सहाध्यायी विद्यार्थ्यांमध्येही मोठा शोक व्यक्त केला जात आहे. शाळेतील शिक्षकांनी सांगितले की मयूर आणि साहिल हे दोघेही अभ्यासात हुशार, खेळात अग्रेसर व सदैव एकत्र असलेले मित्र होते. त्यांच्या अचानक निधनामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेची नोंद शिल्लेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गंगापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत. पुढील तपास पोलीस सुरू ठेवणार आहेत.