

वैजापूर, छत्रपती संभाजीनगर : किशोर पैठणपगारे
शिऊर वैजापूर तालुक्यातील सफियाबादवाडी येथील शाळेमध्ये शिक्षण विभागाच्या तसेच शालेय समितीच्या निष्क्रियतेमुळे सफियाबादवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेतील सेमी इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी आजही पुस्तकांशिवाय शिक्षण घेत असल्याचा प्रकार समोर आला आहे. शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे पालकांमध्ये संताप आहे.
२०२५-२६ शैक्षणिक वर्ष सुरू होऊन पाच महिने उलटले, सहामाही परीक्षा पार पडल्या आणि दिवाळीच्या सुट्ट्याही संपल्या, मात्र विद्यार्थ्यांच्या हाती अद्याप पाठ्यपुस्तके आलेली नाहीत. इयत्ता चौथीतील २० विद्यार्थ्यांना सेमी गणिताचे, तर इयत्ता आठवीतील ३५ विद्यार्थ्यांना सेमी विज्ञानाचे पाठ्यपुस्तक मिळालेले नाही.
शासनाने विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाशी जोडण्यासाठी सेमी इंग्रजी माध्यमाचा उपक्रम राबविला, परंतु पुस्तक पुरवठ्यात मात्र घोर दुर्लक्ष झाले आहे. शिक्षकांकडून जुनी पुस्तके, छापील प्रती आणि स्वतः तयार केलेल्या नोट्सच्या आधारे शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. शालेय समिती अस्तित्वात असूनही तिची भूमिका केवळ नावापुरतीच राहिली आहे. विद्यार्थ्यांच्या मूलभूत शैक्षणिक गरजांकडे समिती व शिक्षण विभागाने दोघांनीही दुर्लक्ष केल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे.
पुस्तकांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांना विषय समजून घेण्यात अडचणी येत असून, शिक्षकांनाही दुहेरी परिश्रम करावे लागत आहेत. पालकांनी वारंवार शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या असल्या तरी काहीच हालचाल झालेली नाही. दरवर्षी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वेळेवर मिळतील अशी घोषणाबाजी केली जाते; मात्र वास्तवात ग्रामीण भागातील विद्यार्थी अजूनही पुस्तकांच्या प्रतीक्षेत आहेत. शासन आणि शालेय समितीने तातडीने लक्ष देऊन पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करावा, अशी मागणी पालक व शिक्षकांनी केली आहे.
मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांची गैरसोय
ही परिस्थिती सेमी माध्यमापुरती मर्यादित नसून, मराठी माध्यमातील शाळांनाही पुस्तक तुटवड्याचा फटका बसला आहे. वैजापूर तालुक्यातील अनेक मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये अजूनही संपूर्ण पाठ्यपुस्तकांचा पुरवठा झालेला नाही. काही विषयांची पुस्तके अपुरी आहेत, तर काही वर्गामध्ये अर्धवट संच मिळाल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम समजून घेण्यात अडचणी येत असल्याने पालकांचे म्हणणे आहे.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम
शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना छायाप्रती व जुन्या पुस्तकांच्या आधारे शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर याचा थेट परिणाम होत असून, पालकवर्गामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. शासनाने सेमी व मराठी दोन्ही माध्यमांतील विद्यार्थ्यांना पुस्तकांचा तातडीने पुरवठा करावा, अशी एकमुखाने मागणी करण्यात आली.