

वैजापूर : लग्न होऊन अवघे सहा महिने झालेल्या २१ वर्षीय शुभांगी वाघचौरे हिने गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना गाढेपिंपळगाव येथे उघडकीस आली आहे. हुंड्यातील राहिलेले ५० हजार रुपये माहेरून आणण्यासाठी सासरच्या मंडळींकडून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला जात असल्याचा आरोप आहे. या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची फिर्याद तिच्या आईने विरगाव पोलिसांत दिली आहे.
त्यावरून पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभांगी गौरव वाघचौरे (२१, रा. गाढेपिंपळगाव, ता. वैजापूर) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिची आई नीता रवळे (रा. जातेगाव, ता. नांदगाव, जि. नाशिक) यांनी फिर्याद दिली.
फिर्यादीनुसार, शुभांगीचे सहा महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर महिनाभरातच सासरच्या मंडळींनी हुंड्यातील उर्वरित ५० हजार रुपये आणण्यासाठी तगादा लावला. या मागणीवरून तिला वारंवार मारहाण, शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप आहे.
या छळाला कंटाळून शुभांगीने लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. या प्रकरणी गौरव संजय वाघचौरे, संजय लक्ष्मण वाघचौरे, विमल संजय वाघचौरे, नवनाथ संजय वाघचौरे आणि शितल नवनाथ वाघचौरे (सर्व रा. गाढेपिंपळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विरगाव पोलिस करीत आहेत.