Vaijapur News | चौकशीच्या नावाखाली तरुणाला पाठीत वळ उठेपर्यंत मारहाण : वीरगाव पोलिस ठाण्यातील प्रकार!

पाठीवर मारहाणीचे वळ, कुटुंबीयांची पोलिसांत तक्रार
Vaijapur News | चौकशीच्या नावाखाली तरुणाला बेदम मारहाण : वीरगाव पोलिस ठाण्यातील प्रकार!
Vaijapur News | चौकशीच्या नावाखाली तरुणाला बेदम मारहाण : वीरगाव पोलिस ठाण्यातील प्रकार!
Published on
Updated on

वैजापूर : ‘तुझा मित्र मुलीला पळवून घेऊन गेला आहे. तो कुठे आहे, सांग,’ असे म्हणत वीरगाव पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक अशोक माने व काही कर्मचाऱ्यांनी मिळून तरुणाला बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. नारायण गिधाने या तरुणाला शनिवारी (दि. ८) सायंकाळी एका गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले होते. यावेळी त्याला मारहाण झाल्याचा आरोप असून, त्यानंतर त्याने उपजिल्हा रुग्णालयात जाऊन वैद्यकीय तपासणी करून घेतली. तपासणीत त्याच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, एका गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने नारायण गिधाने याला वीरगाव पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले होते. यावेळी ‘तुझा मित्र मुलीला पळवून घेऊन गेला आहे. तो कुठे आहे, सांग,’ असा सवाल करत पोलिस उपनिरीक्षकाने त्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीनंतर नारायण गिधाने याने उपजिल्हा रुग्णालय गाठले. तेथे त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याच्या पाठीवर मारहाणीचे अनेक लालसर वळ उमटल्याचे दिसून आले. दरम्यान, रविवारी (दि. ९) या घटनेची माहिती मिळताच तरुणाचे कुटुंबीय आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने वीरगाव पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी संबंधित पोलिस उपनिरीक्षकाला जाब विचारत, तरुणाला झालेल्या मारहाणीप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडेही तक्रार करण्यात आली. नारायण गिधाने यांच्या कुटुंबीयांनी पोलिस उपनिरीक्षकाने मारहाण केल्याची तक्रार वीरगाव पोलिस ठाण्यात दिली आहे.

नारायण गिधाने याच्यावर कोणताही गुन्हा नोंद नसताना त्याला तपासासाठी पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले होते. त्यामुळे तपासासाठी बोलावलेल्या तरुणाला नेमकी मारहाण का करण्यात आली, असा सवाल उपस्थित होत आहे. या आरोपामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित पोलिस अधिकाऱ्यावर काय कारवाई केली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

पाठीवर मारहाणीचे अनेक वळ

तपासासाठी बोलावलेल्या नारायण गिधाने यांच्या पाठीवर मारहाणीचे अनेक लालसर वळ स्पष्ट दिसून आले. मारहाणीनंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालयात नेऊन वैद्यकीय तपासणी करण्यात आली. चौकशीसाठी बोलावलेल्या तरुणाच्या पाठीवर मारहाणीचे वळ उमटत असतील, तर ही चौकशी होती की मारहाण, असा सवाल उपस्थित होत आहे. कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिस ठाण्यातच तरुणाच्या अंगावर मारहाणीच्या खुणा उमटत असतील, तर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे स्वाभाविक आहे.

मुलाच्या पाठीवरील वळ पाहून मन हेलावले

माझ्या मुलाने कुठलाही गुन्हा केलेला नाही. चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावून अशा पद्धतीने मारहाण केली जात असेल, तर सामान्य माणसाचा कायद्यावर विश्वास कसा राहणार? माझ्या मुलाच्या पाठीवरील वळ पाहून आई म्हणून माझे मन हेलावून गेले आहे. आम्हाला न्याय हवा असून, दोषींवर कारवाई झाली पाहिजे. मारहाण झालेल्या तरुणाची आईने सांगितले.

नेमका प्रकार काय घडला, याची माहिती घेत आहे एका गुन्ह्याच्या तपासासाठी या तरुणाला पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले होते. यावेळी आमच्या पोलिस उपनिरीक्षकांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची सध्या मी माहिती घेत असून, नेमका प्रकार काय घडला, याबाबत अधिक तपास करत आहे.

— प्रदीप भिवसने, सहायक पोलिस निरीक्षक तथा ठाणेप्रमुख, वीरगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news