

वैजापूर : Vaijapur farmers protest | वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विकलेले दोन कोटी रूपयांपेक्षा अधिक पैसे व्यापारी देत नसल्याने चारशेहून अधिक शेतकरी गेल्या सहा दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत. याबाबत अद्याप तोडगा निघाला नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज शोले स्टाईल आंदोलनाला सुरुवात केली आहे.
वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या मार्केटमधील साई बालाजी ट्रेडिंग कंपनीचे व्यापारी सागर सुनील राजपूत याने चारशेहून अधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी विकलेल्या कांद्यापोटीचे दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम चार महिन्यांपासून थकवली आहे. पैसे देत नसल्याने शेकडो शेतकरी हे बाजार समितीच्या आवारात मागील सहा दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले होते. मात्र सहाव्या दिवशीही तोडगा न निघाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी शहरातील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. जोपर्यंत आमचे हक्काचे पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत खाली उतरणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला. घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवान, रुग्णवाहिका व पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला असून प्रशासनातील अधिकारी उपस्थित आहेत. तसेच नागरिकांनीही मोठी गर्दी केली आहे.