

सिल्लोड : सिल्लोड शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी आज (दि.६) दुपारपासून अचानक आकाशात ढग जमा होऊन मेघगर्जनेसह विजांचा कडकडाटात पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारा पडल्याने शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील अनेक ठिकाणी झाडे व विजेचे खांब कोसळले. दरम्यान भराडी गावाजवळील सिसारखेडा येथे वीज पडून २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, अशी माहिती तहसीलदार रमेश भोसले यांनी दिली.
सिल्लोड शहरासह तालुक्यात दुपारपासून वादळ वारा व विजांच्या कडकडाटामुळे काही ठिकाणी झाडे व विजेचे खांब पडल्याने खबरदारी म्हणून व संभाव्य धोका टाळण्यासाठी सायंकाळी शहरासह तालुक्यातील अनेक गावांची वीज बंद करण्यात आली होती. वळीव पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून रखरखत्या उन्हापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
सिल्लोड तालुक्यात तालुक्यात भराडी, पालोद, घाटनांद्रा, अन्वी आदी परिसरात अवकाळी पावसासह काही ठिकाणी गारांचाही पाऊस झाला. या अवकाळी पावसाने मका पिकांसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुले शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. भराडी परिसरात रस्त्यावरील विजेचे खांब व झाडे पडली आहे.