Heart attack during family function | दुर्दैवी ! लाडक्या भाचीच्या लग्नाच्या दिवशीच मामाचा हृदयविकाराने मृत्यू

गंगापूर तालुक्यातील उत्तरवाडी गावावर शोककळा
Heart attack during family function
Heart attack during family function
Published on
Updated on

गंगापूर : आनंदाचा सोहळा आणि लग्नाची लगबग सुरू असतानाच, नियतीने घात केला आहे. आपल्या लाडक्या भाचीच्या लग्नासाठी सज्ज झालेल्या मामाचा लग्नाच्या दिवशीच पहाटे झोपेत हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गंगापूर तालुक्यातील उत्तरवाडी येथे घडली आहे. कल्याण दगडू कलापुरे (वय ४८) असे या दुर्दैवी व्यक्तीचे नाव आहे.

​कल्याण कलापुरे हे समृद्धी महामार्गावर रुग्णवाहिका चालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या बहिणीच्या मुलीचे (पानवी ता वैजापूर ) लग्न असल्याने घरी आनंदाचे वातावरण होते. २४ फेब्रुवारी रोजी रात्री हळदीचा समारंभ उरकून ते आपल्या उत्तरवाडी येथील घरी परतले होते. त्यांची पत्नी आणि मुले लग्नामुळे आधीच बहिणीच्या घरी मुक्कामी होती, त्यामुळे रात्री ते घरी एकटेच होते.

​बुधवारी २५ फेब्रुवारी रोजी सकाळी लग्नाचा मुहूर्त असल्याने ते बहिणीकडे जाणार होते. मात्र, सकाळी ९ वाजेपर्यंतही कल्याण घराबाहेर पडले नाहीत, म्हणून त्यांचे लहान बंधू अरुण कलापुरे त्यांना पाहण्यासाठी गेले.

दरवाजा तोडला अन काळजाचा ठोका चुकला...

​घराचा दरवाजा आतून बंद होता आणि हाका मारूनही आतून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर संशय बळावल्याने अरुण यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी कल्याण हे बिछान्यावर निपचित पडलेले आढळले. त्यांना तातडीने खासगी वाहनातून उपजिल्हा रुग्णालय, गंगापूर येथे हलवण्यात आले. परंतु, तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

​मदतीसाठी कोणीच नव्हते जवळ

​रात्री घरी कोणीच नसल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यावर वेळेवर कोणतीही मदत मिळू शकली नाही, ही बाब गावकरी हळहळ व्यक्त करताना सांगत आहेत. भाचीच्या लग्नाच्या दिवशीच 'मामा' गेल्याची बातमी समजताच लग्नमंडपात सन्नाटा पसरला.

​शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

​शवविच्छेदनानंतर सायंकाळी ४ वाजता उत्तरवाडी येथील शिवना नदीकाठी त्यांच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित भाऊ, भावजयी, पुतणे, पत्नी आणि दोन मुले असा मोठा परिवार आहे. एक कर्तव्यदक्ष रुग्णवाहिका चालक आणि मनमिळावू व्यक्तिमत्व हरपल्याने संपूर्ण परिसरातून दुःख व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news