तुमच्यावर पुन्हा उपोषणाची वेळ येणार नाही: सामंत यांची जरांगेंना ग्वाही
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकार सर्व पातळीवर कार्यरत आहे. सगेसोयाऱ्यांचा मुद्दा देखील दिलेल्या मुदतीत मध्येच मार्गी लागेल, असे सांगत मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे यांना पुन्हा उपोषण करावे लागणार नाही, अशी ग्वाही दिली. शनिवारी (दि.१५) मंत्री उदय सामंत, खासदार संदीपान भूमरे, आमदार संजय शिरसाट यांनी रुग्णालयात जात मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांची भेट घेतली.
जरांगे यांनी पाच दिवस उपोषण केले. त्यामुळे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी व राज्य सरकारच्या सर्व कामाची माहिती त्यांना असावी यासाठी विशेष त्यांना भेटायला आलो, असे सामंत पत्रकारांशी म्हणाले. आमचे आरक्षणासोबतच त्यांच्या प्रकृतीला देखील प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हैद्राबाद स्टेट गॅझेटमध्ये मराठवाड्यातील काही मराठा समाजाच्या कुणबी नोंदी आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढाकार घेतलेला आहे. मात्र गरज पडली तर राज्य सरकारचे शिष्टमंडळ आणि मी स्वतः हैद्राबादला जाईल, असा विश्वास सामंत यांनी दिला. तसेच मनोज जरांगे यांनी कुणबी नोंदी शोधण्यासाठी स्थापन संदीप शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी, वंशावळ समितीला मुदतवाढ देणे, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. त्यास सामंत यांनी तत्काळ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, मनोज जरांगे यांनी राज्य सरकारच्या या पुढाकाराची व जलद कामाचे कौतुक केले.
हेही वाचा