

Two female municipal cleaners in the net of bribery
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा : मुलाच्या जन्म प्रमाण-पत्रातील नावामध्ये दुरुस्ती करून देण्यासाठी महापालिकेच्या झोन ९ येथे कार्यरत दोन महिला सफाई कामगारांना दोन हजारांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने शुक्रवारी (दि.२२) रंगेहात पकडले. ही कारवाई मनपा झोन ९ कार्यालय मोंढा नाका, जालना रोड येथे करण्यात आली. शोभा मिठू आ-हेरकर (५६, रा. राहुलनगर), वर्षा वसंत महिरे (३६, रा. कोटला कॉलनी) अशी आरोपींची नावे आहेत.
३९ वर्षीय तक्रारदार यांच्या मुलांच्या जन्म प्रमाणपत्रातील नावामध्ये दुरुस्ती करण्यासाठी तक्रारदार यांनी मनपाच्या झोन ९ च्या कार्यालयात अर्ज केला होता. त्यासाठी शोभाने ३ हजारांची लाच मागितली. तडजोडीअंती २ हजार स्वीकारले. तिला वर्षाने लाच घेण्यास प्रोत्साहन दिल्याचे पडताळणीत उघड झाले.
दोघींना लाच घेताना रंगेहात पकडले. जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, अपर अधीक्षक शशिकांत सिंगारे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक धर्मराज बांगर, वाल्मीक कोरे, जमादार राजेंद्र जोशी, युवराज हिवाळे, पुष्पा दराडे, आशा कुंटे, सी. एन. बागुल यांनी केली. दरम्यान कारवाईमुळे मनापतील कर्मचाऱ्यांध्ये खळबळ उडाली आहे.