

Two Cousins Drown Paithan Chhatrapati Sambhajinagar
पैठण: पैठण तालुक्यातील आगलावे गेवराई येथे आज (दि.८) दुपारी दोन सख्खे चुलत भाऊ शेततळ्यात पोहण्यासाठी गेले असता त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सतीश एकनाथ आगळे (वय १६) व गौरव शिवाजी आगळे (वय १८, रा. गेवराई बु. ता. पैठण) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, आगलावे गेवराई परिसरातील होणाबाचीवाडी शिवारातील एकनाथ आगळे यांच्या शेतातील शेततळ्यात आज दुपारी गेवराई बु. येथील दोन सख्खे चुलत भाऊ सतीश आणि गौरव पोहण्यासाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली.
नातेवाईकांनी नागरिकांच्या मदतीने दोघांना शेततळ्यातून बाहेर काढून तत्काळ आडुळ येथील शासकीय रुग्णालयात नेले. परंतु, वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. आडुळ येथील रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
मृत सतीश आगळे पदवीच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. तर गौरव आगळे दहावी उत्तीर्ण झाला आहे. त्यांच्या निधनावर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.