

Traveling on the Shivajinagar subway in the city is becoming increasingly dangerous for bikers.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील शिवाजीनगर भुयारी मार्गाचा प्रवास दिवसेंदिवस दुचाकीस्वारांसाठी धोकादायक ठरत आहे. या भुयारी मार्गाचा शुभारंभ झाल्यापासूनच पावसाचे पाणी मार्गात तुंबणे, स्लॅब गळणे यासह आता या मार्गात दुचाकी घसरून पडण्याच्या घटनांत वाढ झाल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या उद्घाटनानंतर तीन महिन्यांतच जोरदार पावसाने संबंधित विभागाचे पितळ उघडे पाडले. थोडा जरी जोराचा पाऊस पडला तर हा मार्ग काही वेळ वाहतुकीसाठी ठप्प होतो. तसेच पावसाच्या पाणी टपकण्याचा प्रकार सुरू झाला. आता या मार्गात अचानक दुचाकी घरण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. दररोज किमान दोन ते तीन दुचाकीस्वार येथे घसरून पडत आहेत.
यात अनेकांना किरकोळ तर काहींना गंभीर दुखापती झाल्या आहेत. पावसाळ्यात रस्त्यावर साचणारे पाणी आणि डांबराऐवजी गुळगुळीत सिमेंटचा वापर आणि पावसाचे पाणी साचून हा मार्ग घसरट आहे. हे अपघाताचे मुख्य कारण ठरत असल्याचे नागरिकांचे मत आहे. यावर स्थानिक नागरिकांनी वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधले. मात्र अद्यापही यावर ठोस उपाययोजना झालेली नाही.
उलट करोडो रुपये खर्चुन उभारलेला हा भुयारी मार्ग लोकांसाठी अपघातांचा मार्ग बनला आहे. शहरातील प्रमुख चौकांना जोडणाऱ्या या मार्गावरून दररोज हजारो वाहने धावत असतात. अशा ठिकाणी अपघातांची मालिका सुरू राहणे ही शहर नियोजनातील गंभीर चूक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. उद्घाटनाच्या चमकदार फिती कापण्यासाठी लोकप्रतिनिधी पुढे असतात, पण देखभाल आणि दुरुस्तीच्या वेळी मात्र कोणीही जबाबदारी घेत नसल्याचे नागरिकांचे मत आहे. हा मार्ग सुरू झाल्यापासून काही ना काही घटना घडतच असल्याने दीड वर्ष हाल सोसूनही पदरी निराशाच पडली असल्याची स्थिती आहे.
दरम्यान या भुयारी मार्गाचे तात्काळ पुनरुज्जीवन करून घसरट पृष्ठभागावर खडीमिश्रित डांबर टाकावे, पावसाळी पाणी उपसा यंत्रणा कार्यान्वित करावी आणि प्रकाशयोजना कायमस्वरूपी सुरू ठेवावी, अशी नागरिकांची मागणी आहे. या मार्गावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांचे प्राण प्रशासनाच्या चुकीमुळे धोक्यात येत आहे. यावर तात्काळ उपाययोजना न केल्यास याविरोधात मोठे आंदोलन उभे राहील, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.
भुयारी मार्ग तयार झाल्यनंतर काही कामे पूर्ण होण्याआधीच नागरिकांच्या रेट्यामुळे या मार्गाचे १५ फेब्रुवारी रोजी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या मार्गाच्या कामासाठी शिवाजीनगर मार्ग तब्बल दीड वर्ष बंद होता. त्यामुळे बायपास भागातील रहिवाशांना वळसा घेऊन संग्रामनगर उड्डाणपुलावरून शहर गाठावे लागत होते. त्यानंतरही पावसाचे पाणी तुंबल्याने हा मार्ग काही वेळासाठी बंद राहातो. दीड वर्ष त्रास सोसूनही अजून हाल सुरूच आहेत.