

छत्रपती संभाजीनगर : सिहोर येथून दर्शन करून परतलेल्या महिला रिक्षात पाठीमागे बसून वाळूजकडे जाताना ट्रॅव्हल्सच्या अपघातात ठार झाल्या होत्या. या घटनेनंतर मुजोर रिक्षा चालक युसूफ अन्सारीने थेट दंड केल्याच्या रागातून वाहतूक पोलिसाला चिरडून फरपटत नेले होते. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारला.
दोन दिवसांत हजाराहून अधिक रिक्षा चालकांना लाखोंचा दंड केला. मात्र सकाळची तीन तासांची कारवाई संपली की दुपारनंतर त्याच रिक्षाचालकांचा जुना खेळ पुन्हा सुरू होत असल्याचे चित्र आहे. प्रवासी कोंबून, समोर, मागे लोंबकळत जाणारे लोक, सिग्नलला झिगझेंग कट मारणाऱ्या रिक्षा सुसाट धावताना दिसत आहेत. दोन दिवसांत हजारो रिक्षा चालकांना दंड करूनही काही जण बेलगामपणे रिक्षा दामटत असल्याचे चित्र आहे. एसीपी सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, अमोल देवकर, राजेश यादव, एपीआय हरेश्वर घुगे, सचिन मिरधे यांच्या अधिपत्यात कारवाई करण्यात आली.
विशेष मोहीम
वाहतूक पोलिसांनी शहरातील बेशिस्त, उद्धट, उर्मट वर्तन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाईची सोमवारपासून विशेष मोहीम सुरू केली. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत नियमाप्रमाणे रिक्षा चालविणाऱ्याना त्रास न देता बेशिस्त ६१६ रिक्षा चालकांना ७लाख ४९ हजार ३५० रुपयांचा दंड लावून ३ लाख १६ हजार ६५० जागेवर वसूल केले.