छ. संभाजीनगर : कन्नडच्या औट्रम घाटात होणार ३ बोगदे

Tunnel work : केंद्रीय मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, १५ किलो मीटर लांबी राहणार
Outram Ghat tunnel project
बैठकीत बोलताना केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव. सोबत दोन्ही विभागाचे अधिकारी.pudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : धुळे - सोलापूर महामार्गावर कन्नड येथील औट्रम घाटात आता रस्ते वाहतुकीसह रेल्वे वाहतुक देखील होणार आहे. त्यासाठी या औट्रम घाटाचे डोंगर पोखरुन १५ किलो मीटर लांबीचे ३ बोगदे करण्यास केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या संयुक्त बैठकीत निर्णय घेण्यात आला. रेल्वे आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या माध्यमातून 50 टक्के भागीदारी तत्त्वावर हे काम केले जाणार आहे. त्यानुसार सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

गेल्या अनेक वर्षापासून अर्धवट अवस्थेत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग २४१ सोलापूर-धुळे महामार्ग औट्रम घाटातील बोगद्या संदर्भात मंगळवारी (दि. ८) दिल्लीमध्ये आज संध्यकळी नितीन गडकरी यांच्या निवास स्थानी बैठक झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्हा पर्यटनाची राजधानी आहेच, शिवाय दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोरमुळे राज्याचे औद्योगिक केंद्र बनले आहे. त्यामुळे औट्रम घाटातील प्रलंबित बोगदा आवश्यक असल्याची मागणी माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री खासदार डॉ.भागवत कराड यांनी केली होती.

गतवर्षी केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्वत: या बोगद्याबाबत सकारात्मक्ता दर्शवली आहे. यानंतर बीड-चाळीसगाव हा रेल्वे मार्ग मंजूर करण्यात आला आहे. त्याचे सर्वेक्षण सध्या सुरू आहे. हा रेल्वे मार्ग कन्नडमधून जात असल्याने धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे मार्ग या दोन्हीसाठी एकाच ठिकाणी बोगद्याचे नियोजन केल्यास कमी खर्च लागेल, असेही डॉ. कराड यांनी मंत्र्यांना सांगितले होते. त्यानुसार मंगळवारी या दोन्ही मंत्रालयाच्या वतीने बैठक आयोजित करुन त्यावर चर्चा करुन केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग मंत्री गडकरी आणि रेल्वे मंत्री वैष्णव यांनी दोन्ही मंत्रालयाच्या माध्यमातून ५० टक्के भागीदारी तत्त्वावर या कामासाठी डीपीआर करण्याचे आदेश आपआपल्या मंत्रालयाला दिल्याची माहिती डॉ. कराड यांनी दिली.

यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार डॉ. भागवत कराड, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अलोक दीपंकर, प्रादेशिक अधिकारी मनोज कुमार, बाळासाहेब ठेंग, उद्योजक विवेक देशपांडे, राम भोगले यांच्यासह मंत्रालयातील दोन्ही विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

एक बोगदा राखीव राहणार

कन्नडच्या औट्रम घाटात राष्ट्रीय महामार्गासाठी एक बोगदा राहणार आहे. त्यातून जड वाहतुक होईल. तर दुसऱ्यातून रेल्वे वाहतूक होणार आहे. तिसरा बोगदा हा राखीव ठेवण्यात येणार आहे.

११० कि.मी.चा फेरा वाचणार

कन्नड घाटातील औट्रम घाटात बोगदा नसल्याने सध्या जड वाहनांधारकांना तब्बल ११० किलोमीटरचा फेरा मारून जावे लागते. दररोज २२ हजार जड वाहने अशाच प्रकारे जात आहेत. मात्र, बोगदा झाल्यास हा फेरा वाचणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news