

Thousands of citizens take to the streets over child abuse
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा नाशिकच्या मालेगाव-डोंगराळे गावातील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि.५) सकल सुवर्णकार समाजातर्फे भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. श्रद्धांजलीने सुरुवात झालेल्या या मोर्चात महिला, तरुणी आणि विविध समाजांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
यावेळी आरोपीला त्वरित फाशी द्या, अशा घोषणांनी शहरातील क्रांती चौक ते गुलमंडी परिसर दणाणून गेला. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सराफ व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीन दुकाने बंद ठेवली. मोर्चाचा समारोप विभागीय आयुक्तालयासमोर झाला. वैदेही कुलथे, आदिती डहाळे यांच्यासह पाच बालिकांनी व्यासपीठावरून कठोर कायद्यांची गरज प्रतिपादित केली. यानंतर शिष्टमंडळामार्फत निवेदन सादर करण्यात आले.
हजारो नागरिकांच्या सहभागामुळे मोर्चा लक्षवेधी ठरला. विभागीय आयुक्तालयासमोर व्यासपीठावर संत नरहरी महाराजांचे प्रतिनिधी, आमदार प्रदीप जैस्वाल, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, आंबेडकरी नेते विजय वाहुळ, हभप निवृत्तीनाथ वाडेकर महाराज, धर्मासिंहनी डॉ. गायत्री दीदी यांनी परखडपणे विचार मांडले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तसेच सुवर्णकार संघटनांचे पदाधिकारी यांच्यासह आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मोर्चाच्या यशस्वितेसाठी आयोजक आदित्य दहिवाळ व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या मोर्चासाठी छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण पोलिसांचा विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
हजारो नागरिकांनी झळकावले निषेधाचे फलक
या मोर्चास जिल्ह्याबाहेरून नागरिकांची संख्या हजोरोंच्या स्वरूपात होती. मोर्चाचे एक टोक क्रांती चौकात होते, तर दुसरे टोक गुलमंडी चौकापर्यंत होते. मोर्चेकऱ्यांच्या हातामध्ये विविध घोषणांचे फलक होते. तसेच सदर घटनेच्या निषधार्थ हजारो मोर्चेकऱ्यांनी आपल्या हाताला काळी पट्टी लावून निषेध नोंदवला.
नागपूरच्या अधिवेशनात वेधणार शासनाचे लक्ष : आ. जैस्वाल
अशा बलात्कारी प्रवृत्तींना वेळीच ठेचणे गरजेचे आहे. अशा घटना वारंवार होऊ नयेत यासाठी शासनाने कडक पावले उचलली पाहिजे. त्यासाठी नागपूरच्या अधिवेशनात राज्य शासनाचे याप्रकरणी लक्ष वेधून संबंधित अत्याचार करणाऱ्या नराधमास कठोरात कठोर कार्यवाही करून भरचौकात फाशीची शिक्षा द्यावी. तसेच हा खटला फास्ट ट्रॅक न्यालयात लढवण्यात यावा आणि या खटल्यासाठी सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्र्यांकडे मी करणार आहे, अशी ग्वाही यावेळी आ. प्रदीप जैस्वाल यांनी दिली.