

There is a severe shortage of blood in the sambhajinagar city
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मेडिकल हब म्हणून ओळख असलेल्या शहरात गेल्या काही दिवसांपासून रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. उन्हाच्या कडाक्याने रक्तदान शिबिराचे आयोजन घटल्याने रक्तदातेही पुढे येत नाहीत. परिणामी, घाटीसह शहरातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची तीव्र टंचाई जाणवत आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी दात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होतो. यंदाही उन्हामुळे महिन्याभरापासून शहरात रक्तदान शिबीरांचे आयोजन जवळपास नाहीच आहे. याचा परिणाम रक्तपेढ्यांवर दिसून येत असून, घाटीतील रक्ताची मोठी टंचाई जाणवत आहे.
घाटीतील शासकीय रक्तपेढीत अवघ्या तीन दिवस पुरेल ऐवढाच रक्तसाठा शिल्लक आहे. इतर खासगी रक्तपेढ्यांवर हीच परिस्थिती आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी रक्तपिशवी घेण्यासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तपेढ्यांतर्फे रक्तदान करण्याचे शासकीय रक्तपेढीसह इतर खासगी रक्तपेढ्यांवर सांगितले जात आहे. रक्ताची गरज भागवण्यासाठी रक्तपेढ्यांकडूनच रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र, या शिबिरांना अल्पप्रतिसाद मिळत असल्याने नागरिकांनी पुढे येऊन रक्तदान करावे. असे आवाहन करण्यात आले आहे.