दरोडेखोरांच्या हल्ल्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तालुकाध्यक्षांचा मृत्यू

दरोडेखोरांच्या हल्ल्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तालुकाध्यक्षांचा मृत्यू
Chhatrapati Sambhajinagar news
दरोडेखोरांच्या हल्ल्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तालुकाध्यक्षांचा मृत्यू pudhari photo
Published on
Updated on

खुलताबाद : तालुक्यातील गल्ले बोरगाव येथील स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष यांच्या घराचा मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश करीत त्यांच्यावर दरोडेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा छत्रपती संभाजीनगर येथे उपचार दरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. १७) घडली. राजू आसाराम हारदे (वय ५२) असे या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांचे नाव आहे.

खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगावतील हारदे गल्लीत राजू हारदे यांचे घर आहे. मंगळवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास पाच ते सहा दरोडेखोरांनी आजूबाजूच्या सात ते आठ घराच्या बाहेरून कड्या लावून घेत राजू हारदे यांच्या घराचा मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरामध्ये त्यांची पत्नी व ते दोघेच पाठीमागच्या खोलीत झोपलेले होते. दरवाजा तोडण्याच्या आवाजामुळे या दोघांना जाग आली. दरवाजाकडे येताच दरोडेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. त्यांच्या पत्नीने माझ्या नवऱ्याला मारू नका अशी विनंती केली, मात्र दरोडेखोरांनी राजू हारदे यांच्या पोटात व डोक्यात चाकूने वार केले. यात ते गंभीर जखमी होऊन जमिनीवर पडले.

हे पाहून त्यांच्या पत्नीने मदतीसाठी आरडाओरड केली मात्र शेजाऱ्यांच्या घराच्या कड्या बाहेरून लावल्यामुळे त्वरित कोणालाही मदतीला येता आले नाही. शेजारी राहणाऱ्या एकाने आपल्या घराचा पाठीमागील दरवाजा उघडून मदतीला आला. त्यामुळे चोरट्यांनी कोणताही ऐवज न घेता तिथून पळ काढला.

शेजाऱ्यांनी झालेल्या घटनेची माहिती पोलिस पाटील सिंधुताई बढे, माजी सरपंच विशाल खोसरे यांना दिली. खुलताबाद पोलिस स्टेशनला माहिती मिळाल्यावर पोलिस निरीक्षक धनंजय फराटे, पोलिस कॉन्स्टेबल रतन वारे आदी घटना स्थळी दाखल झाले,

राजू हारदे यांच्या पोटात चोरट्यांनी चाकूचे दोन ते तीन वार केल्यामुळे मोठा रक्तस्त्राव चालू झाला होता. त्यांना ग्रामस्थांच्या मदतीने उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी पाच वाजता त्यांचा मृत्यू झाला. दुपारी दोन वाजता गल्लेबोरगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुल, जावई असा परिवार आहे. दरम्यान, आमदार प्रशांत बंब यांनी घटनास्थळी भेट दिली व संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना घटनेचा कसून तपास करण्याच्या सूचना दिल्या.

याशिवाय छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलिस अधिक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलिस अधिकारी विजयकुमार ठाकुरबाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश वाघ, खुलताबाद पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक धनंजय फराटे, पोलिस उपनिरीक्षक मधुकर मोरे, पोलिस पाटील सिंधुताई बढे, माजी सरपंच विशाल खोसरे यांनी भेट दिली.

गल्लेबोरगावात दरोडेखोरांनी मध्यरात्री सर्वप्रथम इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका सुरेखा नरोटे यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता. सुट्ट्या असल्याने शिक्षिका नरोटे या आपल्या गावी गेल्यामुळे तिथे दरोडेखोरांना काही सापडले नाही. त्यांनी आपला मोर्चा देवगाव फाटा मार्गे गल्लेबोर गावात प्रवेश केला. राजू हारदे यांच्या घरी प्रवेश करत त्यांना जखमी केले नंतर बस स्थानक रस्त्यात भगवान चव्हाण यांना देखील दगड मारून जखमी करून तिथून राष्ट्रीय महामार्ग सोलापूर धुळे हायवे मार्गे पळ काढला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news