

The Shiv Sena has the highest number of candidates in the municipal corporation elections.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
यावेळी सर्वच पक्ष स्वतंत्रपणे लढत सेवा : महापालिका निवडणुकीत आहेत. या आखाड्यात उमेदवार उतरविण्यात शिंदेंच्या शिवसेनेने आघाडी घेतली आहे. शिवसेनेने सर्वाधिक ९६ जागांवर उमेदवार उतरविले आहेत. त्यापाठोपाठ ठाकरे सेनेने ९५ आणि भाजपाने ९२ जागांवर उमेदवार दिले आहेत.
महापालिकेचे ११५ नगरसेवक निवडण्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. २९ प्रभागांमधून हे सदस्य निवडले जाणार आहेत. यावेळी पहिल्यांदाच सर्व पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
राज्यातील सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष स्वबळ आजमावत आहेत याशिवाय एमआयएम, वंचित बहुजन आघाडी यांनीही बहुसंख्य जागांवर आपापले उमेदवार उतरविले आहेत. त्यामुळे सर्वच प्रभागात बहुरंगी लढती होत आहेत.
महापालिकेसाठी सर्वाधिक ९६ उमेदवार हे शिवसेनेने दिले आहेत. त्यापाठोपाठ ठाकरे सेनेने ९५ उमेदवार दिले आहेत. तर भाजपाला ९२ जागांवरच उमेदवार मिळू शकले. एमआयएम ४९, काँग्रेस ७३, राष्ट्रवादी काँग्रेस ८७ आणि वंचित बहुजन आघाडी ६२ जागांवर निवडणूक लढवित आहे.
निवडणूक लढविण्याची इच्छापूर्ती
शहरात दहा वर्षांपासून महापालिकेची निवडणूक झालेली नव्हती. त्यामुळे यावेळी इच्छुकांची संख्या मोठी होती. परंतु महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी सुरुवातीला मित्रपक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढविण्याचे ठरविले होते. त्यामुळे उमेदवारांना तिकीट मिळण्याची शक्यता कमी झाली होती. मात्र, नंतर जागांच्या वाटाघाटी बिनसल्या आणि सर्वच पक्षांनी स्वतंत्रपणे उमेदवार देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बहुसंख्य कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाली. परिणामी, त्यांची निवडणूक लढविण्याची इच्छापूर्ती होऊ शकली आहे.