

The murals at Shivsrishti will now be protected by glass
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यालगत उड्डाणपुलाखाली स्मार्टसिटीने अडीच कोटी रुपये खर्चुन प्रत्येक नागरिकांना आकर्षित करणारी शिवसृष्टी उभारली आहे. यात ५२ भित्तिचित्रातून शिवरायांचा जीवनपट मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या भित्तिचित्रांवर धुळीचे लोळ साचत असल्याने त्याच्या सुर-क्षेसाठी आता स्मार्टसिटीने काचेचे संरक्षा कवच तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.
महापालिकेकडून क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या नूतनीकरणाचे काम करण्यात आले. यात शिवरायांचा नवा अश्वारूढ पुतळा बसविण्यात आला. त्यानंतर या ठिकाणी उड्डाणपुलाखाली शिवसृष्टी उभारण्याचे काम स्मार्ट सिटीमार्फत हाती घेण्यात आले होते.
२०२३ मध्ये शिवजयंतीच्या मुहूर्तावर ही शिवसृष्टी शिवप्रेमींसाठी खुली करण्यात आली होती. येथे व्हीजवल आर्ट गॅलरी बनविण्यात आली असून, शिवरायांचे कार्य सांगणारी २६ आणि गडकिल्ल्यांची माहिती देणारी ५२ भित्तिचित्रे लावण्यात आली आहेत. सुमारे दोन कोटी रुपयांचा खर्च यावर करण्यात आला आहे.
या भित्तिचित्रांची निवड करण्यासाठी इतिहासकार इंद्रजित सावंत यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्यात आली होती. क्रांती चौक वर्दळीचे ठिकाण असून, या ठिकाणी येणारे नागरिक शिवसृष्टीला भेट देतात. दरम्यान वाहनांच्या वर्दळीमुळे या भित्तिचित्रांवर धूळ साचत होती. त्यामुळे ते खराब होण्याची शक्यता असल्याने स्मार्टसिटीने काचेचे कवच तयार करण्याचे काम सुरू केले आहे.