

The motorcyclist was hit by a speeding car
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
राँग साईडने आलेल्या सुसाट कारचालकाने दुचाकीस्वाराला उडविले. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला जबर मार लागला असून पाय फॅक्चर झाला आहे. ही घटना रविवारी (दि.१८) दुपारी अडीचच्या सुमारास कांचनवाडी, धुळे सोलापूर हायवेवर घडली.
अविनाश ज्ञानेश्वर कांबळे (४०, रा. सुधाकर नगर, रिपब्लिक सोसायटी) असे जखमीचे नाव आहे. कारचालक नशेत होता, असा आरोप जखमींच्या नातेवाईकांनी केला.
कांबळे यांच्या पत्नी भाग्यश्री यांच्या फिर्यादीनुसार, अविनाश हे बांधकाम साईटवर काम करतात. ते दुचाकीने कामावरून घराकडे निघाले. त्याचवेळी धुळे-सोलापूर महामार्गाने एएस क्लबकडून एक कारचालक (एमएच-२०- एफजी १०४०) सुसाट आला. त्याला कांचनवाडीत जायचे असल्याने त्याने लिंक रोडवरील उड्डाणपूल ओ लांडल्यानंतर सर्व्हिस रोडने येणे अपेक्षित होते. मात्र, तो महामार्गावरून आला. कांचनवाडीतील उड्डाणपूल ओलांडल्यानंतर त्याने अचानक वेगात यू टर्न घेत राँग साईडने सुसाट निघाला आणि समोरून येणाऱ्या अविनाश कांबळे या दुचाकीस्वाराला उडविले.
ही धडक एवढी भीषण होती की, कांबळे यांच्या दुचाकीचा चुराडा झाला. ते बाजूच्या दुभाजकावर आदळले. यात त्यांचे डोके, पाय आणि हाताला गंभीर दुखापत झाली. हाताचे एक बोट निकामी झाले.
याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार सोनुने करीत आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली.