छत्रपती संभाजीनगर पुढारी वृत्तसेवा सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्ष यांनी एकत्र येऊन आचारसंहितेपूर्वी प्रलंबित मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा. आर क्षणाच्या प्रश्नाला राजकीय मुद्दा बनवू नये अन्यथा दोघांनाही आगामी निवडणुकीत दाखवून देऊ. गनिमी काव्याने सळो की पळो करून सोडू, असा इशारा महायुती व महाआघाडीच्या नेत्यांना मराठा मावळा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. माणिकराव शिंदे यांनी दिला. ते मंगळवारी (दि.८) पत्रकार परिषदेत बोलत होते.
पुढे बोलताना प्रा. शिंदे म्हणाले की, सर्वच पक्षातील नेत्यांनी ओबीसीमधून मराठा आरक्षणासाठी पुढाकार घ्यावा. जाहीरनाम्यात हा मुद्दा समाविष्ट करावा. जर हे नाही झाले तर निवडून आल्यानंतर आम्ही ओबीसीतून टिकणारे मराठा देऊ, असे लेखी द्यावे अन्यथा या पक्षांच्या सभा राज्यभर होऊ देणार नाही, असा इशारा प्रा. शिंदे यांनी दिला.
तसेच आपण मुंबईसह राज्यभर फिरून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वच विरोधी, सत्ताधारी पक्षांच्या प्रमुखांना प्रत्यक्ष भेटून ओबीसीतून आरक्षण देण्याला लेखी पाठिंबा द्या, अशी निवेदने दिली. परंतु आजवर आपणास एकाही पक्षप्रमुखांनी लेखी दिले नसल्याने घोर निराशा झाली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रा. माणिकराव शिंदे, पंढरीनाथ गोडसे, भरत कदम, कल्पना चव्हाण, संजय गायके, विक्रम जिवरग, समाधान शिंदे, दीपक राऊत, संतोष कुशेकर, श्रीकेश साठे, दत्तात्रय मोगल, गोपी निकम यांची उपस्थिती होती.