

The horror of the kidnapping of a schoolgirl in Shivajinagar
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
शिकवणीसाठी गेलेल्या दहा वर्षीय मुलीचे चौघांनी कारमधून अपहरण केले. चालकाने प्रतिकार केल्याने आरोपींनी त्याच्या हातावर चाकूने वार केला. तेथून काही अंतरापर्यंत चालक पाठलाग करत राहिला.
मुलीने कारमध्ये एकाला चावा घेतला. आरडाओरड झाल्याने नागरिक धावले. कारवर दगडफेक करताच अपहरणकर्त्यांनी मुलीला कारबाहेर सोडून सारा राजनगरकडे पळ काढला. मात्र तिथे एका गल्लीत त्याची कार अडकली. रस्ता सापडत नसल्याने अपहरणकर्ते कार सोडून पसार झाले. हा थरार बुधवारी (दि.१६) सायंकाळी सातच्या सुमारास नाथ प्रांगण, गारखेडा भागात घडला.
मी मुलीच्या आजोबांकडे अनेक वर्षांपासून चालक म्हणून काम करतो. तिला दररोज शिकवणीसाठी घेऊन जात होतो. जेव्हा अपहरण झाले तेव्हा त्यांच्या मागे जिवाच्या आकांताने पळालो. हातावर त्यांनी चाकूने वार केला, पण पाठलाग सोडला नाही. मुलगी वाचली आणि जीवात जीव आला, असे म्हणताना चालक नवनाथ छेडे यांच्या डोळ्यात अश्रू वाहत होते.
अधिक माहितीनुसार, १० वर्षीय मुलगी इयत्ता सहावीत शिकते. तिची आई नसल्याने ती औरंगपुरा भागात तिच्या आजोबाकडे (आईचे वडील) राहते. आजोबा रियल इस्टेटचा व्यवसाय करतात. मुलीला दररोज सायंकाळी पाचच्या सुमारास चालक नवनाथ छेडे हा कारने नाथ प्रांगण भागात शिकवणीसाठी घेऊन जातो. बुधवारीही मुलीला घेऊन गेला होता. चालक नवनाथ शिकवणी होईपर्यंत इमारतीच्या खालीच कारमध्ये थांबतो. शिकवणी असलेल्या इमारतीत मुलीची मावशीही राहते. दरम्यान, सायंकाळी सातच्या सुमारास मुलगी इमारतीच्या खाली आली. कारमध्ये बसत असताना एक जण इशारा करत नवनाथकडे आला. तोपर्यंत मुलीला तीन अपहरणकर्त्यांनी जुनाट सँट्रो कारमध्ये जबरदस्तीने बसविले. चालक नवनाथने त्यांना प्रतिकार सुरू केला.
तेव्हा एकाने त्याच्या हातावर चाकूने वार केला. तरीही जिवाच्या आकांताने नवनाथने कारचा पाठलाग सुरू केला. अप-हरणकर्ते शिवाजीनगर भुयारी मार्गाकडे सुसाट निघाले. मात्र नवनाथ हे ओरडत मागे धावत होते. वाईन शॉपजवळ अपहरणकर्त्यांच्या कारसमोर ट्राफिक लागले. तेव्हा आरडाओरड ऐकून धावलेल्या लोकांनी कारवर दगडफेक सुरू केली. तेव्हा अपहरणकर्त्यांनी मुलीला तिथेच सोडून साराराज नगरच्या दिशेने धूम ठोकली. मात्र तेथील गल्ली क्र. ४ मध्ये कार बोळीत अडकली. रस्ता सापडत नसल्याने चौघे कार तेथेच सोडून पसार झाले. दरम्यान, एन-४ भागातील बिल्डर पुत्राचे अपहरण झाल्याची घटना फेब्रुवारीत घडल्यानंतर त्याची पोलिसांनी सुखरूप सुटका केली होती. त्यानंतर पुन्हा या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
कारमध्ये अपहरणकर्त्यांनी मुलीला वडिलांचा मोबाईल नंबर मागितला. तेव्हा तिने १०० नंबर सांगितला आणि एकाच्या हाताला करकचून चावा घेतला. त्यानंतर शिवाजीनगर जवळ तिला त्यांनी सोडून पळ काढला.
शिवाजीनगर येथे तिला सोडल्यानंतर नागरिकांनी तिला एका रिक्षाने शिकवणीच्या ठिकाणी पाठवले. तिथे सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत तौर पाटील, शिल्पा चुडीवाल यांनी धीर दिला. त्यानंतर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ हेही दाखल झाले. घटनेची माहिती मिळताच पुंडलिकनगर ठाण्याचे निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी देखील फौजफाटा घेऊन धाव घेतली.
डीसीपी प्रशांत स्वामी, एसीपी रणजित पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार, शिवचरण पांढरे यांनी ठाण्यात धाव घेतली होती. मुलीचा जबाब घेण्यात आला. अपहरणाच्या मार्गावरील सर्व सीसीटीव्हीची पाहणी केली जात आहे. आरोपींच्या अटकेसाठी गुन्हे शाखेसह विविध पथके रात्रभर परिसर पिंजून काढत होते.