

The BJP's mission is now the Zilla Parishad and Panchayat Samiti elections
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महापालिकेवर सत्ता मिळवल्यानंतर भारतीय जनता पार्टीने आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांकडे लक्ष केंद्रित केले असून, जिल्हा परिषद काबीज करण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.१८) पक्षाच्या कार्यालयात उत्तर ग्रामीण व दक्षिण ग्रामीण विभागातील पदाधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीस जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट, दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांच्यासह दोन्ही विभागांतील प्रमुख पदाधिकारी, मंडल अध्यक्ष व संघटनात्मक जबाबदारी सांभाळणाऱ्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
महापालिकेत घवघवीत यश प्राप्त केल्यानंतर भाजपकडून आता जिल्हा परिषद, पंचायत समिती काबीज करण्यासाठी पक्षाकडून रणनिती आखण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीच्या तयारीसाठी रविवारी पक्षाच्या कार्यालयात मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील उत्तर ग्रामीण व दक्षिण ग्रामीण विभागातील पदाधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीत बूथ पातळीवरील संघटनात्मक कामकाज, मतदारांशी संपर्क वाढविण्यावर भर आणि संभाव्य उमेदवारांची चाचपणी, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. महापालिका निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढला असून, त्याच धर्तीवर ग्रामीण भागातही संघटन मजबूत करण्यावर जोर देण्यात येत आहे.
प्रत्येक गट, गण व पंचायत समिती स्तरावर कार्यकर्त्यांची जबाबदारी निश्चित करून सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि सरकारच्या योजनांचा प्रभावीपणे प्रचार करण्याची रणनीतीही ठरवण्यात आली. यावेळी मंत्री सावे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, महापालिकेतील विजय हा केवळ सुरुवात आहे.
ग्रामीण भागातही भाजपची ताकद वाढविण्यासाठी संघटनात्मक शिस्त, कार्यकर्त्यांची सक्रियता आणि योग्य उमेदवारांची निवड महत्त्वाची आहे. तसेच निवडणूक जिंकण्यासाठी नव्हे, तर विकासाचा अजेंडा घेऊन मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन त्यांनी केले. या बैठकीमुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजपने तयारीचा श्रीगणेशा केला असून, येत्या काळात ग्रामीण राजकारणात हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.